WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

राजकीय पक्षांचे जोरदार शक्तीप्रदर्शन


राजकीय पक्षांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

जि. प., पं. स. साठी 43 उमेदवारी अर्ज, उद्या शेवटचा दिवस

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ एक दिवस शिल्लक असताना मंगळवारी तालुक्यात इच्छूक उमेदवारांची अक्षरशः झुंबड उडाली. मंगळवार अखेर ९ जिल्हा परिषद गटांसाठी १७, तर पंचायत समितीच्या १८ गणांसाठी तब्बल २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच शिवसेना–भाजप युतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत निवडणूक रणधुमाळीला वेग दिला आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असून, काही ठिकाणी बंडाचे निशाण फडकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


नगर परिषद निवडणुकीतील यशानंतर शिंदेसेना आणि भाजप जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तितक्याच जोमाने मैदानात उतरली आहे. मंगळवारी ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि मिरवणुकीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विशेषतः शिंदेसेना–भाजप युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि जोश पाहायला मिळाला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनीही सनईबाजाच्या तालावर उमेदवारी अर्ज दाखल करत आपली ताकद दाखवून दिली.

या शक्तीप्रदर्शनामुळे चिपळूण येथील प्रांत कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी उसळली होती. याचा फटका महामार्गावरील वाहतुकीला बसला असून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांच्या हस्तक्षेपाने कोंडी सोडवण्यात आली.

तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटांपैकी कळवंडे, पेढे व शिरगांव गटात प्रत्येकी १, खेर्डी, अलोरे, उमरोली व वहाळ या चार गटांत प्रत्येकी २, तर सावर्डे व कोकरे गटात प्रत्येकी ३ असे एकूण १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

तर पंचायत समिती गणांसाठी कळवंडे, खेर्डी, वेहेळे, शिरगांव, मांडकी, निवळी, वहाळ, कोकरे व कुटरे येथे प्रत्येकी १, भोम, पेढे, दळवटणे, अलोरे, पिंपळी खुर्द, सावर्डे व गुढे येथे प्रत्येकी २, तर उमरोली गणात सर्वाधिक ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विशेष बाब म्हणजे कापसाळ गणात अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

माजी पदाधिकारी पुन्हा मैदानात
या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राजकारणात जुने चेहरे पुन्हा सक्रिय झाले आहेत. माजी सभापती पूजा निकम, धनश्री शिंदे, सुरेश खापले, जितेंद्र चव्हाण, विनोद झगडे, तर माजी उपसभापती सुर्यकांत खेतले, शरद शिगवण, युवराज राजेशिर्के, संतोष चव्हाण तसेच माजी सदस्य दिशा दाभोळकर व नितीन ठसाळे यांनी निवडणूक रणांगणात उडी घेतल्याने ही लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!