ऊरूसपूर्वी पोफळी रस्त्यावरील खड्डे न भरल्यास रस्त्यावर उतरू!
माजी तंटामुक्ती अध्यक्ष मैनुद्दीन सय्यद यांचा इशारा
शिरगाव (चिपळूण) : चिपळूण तालुक्यातील पोफळी येथे हजरत पीर सिकंदर अली शाह उर्फ आकूसखा बाबा यांचा ऊरूस ४ फेब्रुवारी रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या या ऊरूसनिमित्त हजारो भाविक पोफळी येथे दाखल होतात. मात्र, गुहागर–विजापूर मार्गावरील पोफळी येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, यामुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पोफळी सय्यदवाडीपासून थेट पीर बाबांच्या दर्ग्यापर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी रस्त्याची चाळण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या रस्त्यावरून वाहन चालवताना अपघातांची भीती कायम असून, आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात घडून नागरिक जखमी झाले आहेत. तसेच रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत पोफळी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष मैनुद्दीन सय्यद यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधून रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. मात्र, “प्रथम कुंभार्ली घाटातील खड्डे बुजवले जातील, त्यानंतर पोफळी रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल,” असे सांगून अधिकारी केवळ आश्वासनांवरच बोळवण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ऊरूससाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येणार असल्याने या रस्त्याची दुरुस्ती अत्यावश्यक आहे. ऊरूसपूर्वीच रस्त्यावरील खड्डे न भरल्यास पोफळी ग्रामस्थांसह रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा मैनुद्दीन सय्यद यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणी आमदार शेखर निकम यांनी लक्ष घालून तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी पोफळी ग्रामस्थ आणि माजी तंटामुक्ती अध्यक्ष मैनुद्दीन सय्यद यांनी केली आहे. ऊरूसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्वरित हालचाल न केल्यास मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.












