WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

ॲट्रोसिटी प्रकरणात ३५ आरोपी निर्दोष


ॲट्रोसिटी प्रकरणातील ३५ आरोपी निर्दोष

चिपळूण : मौजे मार्गताम्हाने येथील २०१३ सालच्या ॲट्रोसिटी प्रकरणात चिपळूण येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ३५ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व पुरावे विचारात घेऊन हा निकाल दिला.

माहितीनुसार, मार्गताम्हाने गावातील पद्मावती देवीच्या पालखी सोहळ्यादरम्यान मराठा समाज व चर्मकार समाज यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादातून चर्मकार वाडीतील काही व्यक्तींनी आरोपींविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. संबंधित घटना २३ मार्च २०१३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर घडल्याचा आरोप फिर्यादीने केला होता.

मात्र, त्याच दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही समाजातील प्रतिनिधी, डीवायएसपी चिपळूण, चिपळूण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडून वाद मिटवण्यात आला होता. तसेच गावात पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर नंतर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतील घटनांबाबत न्यायालयाने सखोल परीक्षण केले.

या खटल्यात सरकारी पक्षाकडून एकूण १० साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यांच्या साक्षीत आढळलेल्या विसंगती व उलटतपासणीतील बाबींचा एकत्रित विचार करता आरोपींविरुद्ध गुन्हा शाबीत होऊ शकला नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

यामुळे सर्व ३५ आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. आरोपींच्या वतीने चिपळूण येथील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. नितीन केळकर यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. सोहम भोजने व अ‍ॅड. अनिश केळकर यांनी सहकार्य केले

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!