WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

भास्कर जाधव साहेब ‘दिलदार’ विरोधक : ना. उदय सामंत


भास्कर जाधव साहेब ‘दिलदार’ विरोधक : ना. उदय सामंत

चिपळुणातील कार्यक्रमात राजकीय सौहार्दाचे दर्शन

पालकमंत्र्यांकडून कौतुकाचा वर्षाव 

🔺सुशांत कांबळे 🔺

चिपळूण : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चिपळूण अर्बन बँक यांच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात कोकणातील राजकीय सौहार्द आणि परस्पर आदराचे अनोखे चित्र पाहायला मिळाले. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी शिवसेना उबाठा गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या मनमोकळ्या स्वभावाची आणि माणुसकीची विशेष दखल घेत कौतुकाचा वर्षाव केला.

आपल्या भाषणात सामंत म्हणाले की, “कोकणातील लोकप्रतिनिधींच्या मनात किती माणुसकी असते याचे ज्वलंत उदाहरण आज भास्कर जाधव साहेबांनी दाखवून दिले. मला पुढील कार्यक्रमासाठी घाई असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी ‘तू लवकर जा, मात्र पुढे हेलिकॉप्टर किंवा विमानाने प्रवास करताना पूर्ण काळजी घे’ हे सांगणारा दिलदार विरोधकही आपल्या जिल्ह्यात आहे, याचे आपल्याला मानसिक समाधान वाटत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

व्यासपीठावर ना. उदय सामंत व आ. भास्कर जाधव शेजारी-शेजारी बसले होते. राजकीय विरोधक असलेल्या या दोघांना एकमेकांशी दिलखुलास चर्चा करताना पाहून पत्रकारांनी ते क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले. हाच धागा पकडून ना. सामंत म्हणाले, व्यासपीठावर बसल्यापासून पत्रकार आमच्या दोघांचे विविध अँगलने फोटो घेत होते, त्यामागील खरी भावना हीच आहे,” असेही सामंत यांनी हलक्याफुलक्या शैलीत सांगितले.

कोकणातील राजकारण हे विकासाभिमुख आणि एकमेकांना साथ देणारे असल्याचे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, “इथल्या लोकप्रतिनिधींची मानसिकता ही विकासाची आणि परंपरा जपण्याची आहे. याचे उत्तम उदाहरण आज या कार्यक्रमातून दिसले.”

उद्घाटनाच्या नियोजनाबाबत बोलताना सामंत यांनी स्पष्ट केले की, बँकेचे पदाधिकारी त्यांच्या भेटीस आले असता त्यांनी सर्व नेत्यांना एकत्र व्यासपीठावर उपस्थित राहण्याचा आग्रह धरला. “माझ्या उपस्थितीमुळे भास्कर जाधव साहेब किंवा आमदार शेखर निकम सर येतील की नाही, अशी शंका त्यांच्या मनात होती. मात्र मी स्पष्ट सांगितले की उद्घाटन सोहळा हा सर्वांच्या उपस्थितीतच व्हावा. हा कोकणाचा राजकीय संस्कार आहे,” असे ते म्हणाले.

या वेळी त्यांनी बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल व सहकारी यांचेही विशेष आभार मानले. या कार्यक्रमातून कोकणातील राजकारणातील परस्पर सन्मान, सौहार्द आणि विकासाभिमुख दृष्टीकोन अधोरेखित झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!