चिपळूण, सावर्डे येथून दोन तरुणांचे अपहरण
तालुका हादरला, पैशांच्या वादातून घडले प्रकार, सहा जणांवर गुन्हे दाखल
चिपळूण : तालुक्यातील चिपळूण शहर व सावर्डे येथे पैशांच्या वादातून दोन तरुणांचे अपहरण केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे चिपळूण तालुका हादरून गेला आहे. याप्रकरणी एकूण सहा जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील सावर्डे बाजारपेठ येथे दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास वीस वर्षीय सिद्धेश मारुती शिंगरे याचे अपहरण झाल्याची फिर्याद त्याची आई मेघा मारुती शिंगरे (वय ४५, रा. बिडलीनगर , महाडिक कॉम्प्लेक्स, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग, मूळ रा. कोकीसरे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात दिली.
फिर्यादीनुसार, संशयित आरोपी तेजस गायकवाड, शुभम गायकवाड, राजू गायकवाड व विनोद टक्के (पूर्ण पत्ता अज्ञात, सर्व रा. मुंबई) यांनी संगनमताने संबंधित तरुणाचे अपहरण केले. सिद्धेश शिंगरे व संशयित आरोपी यांच्या गाडीचा सावर्डे बाजारपेठ येथे अपघात झाला होता. या अपघातात नुकसान झालेल्या गाडीची नुकसान भरपाईची रक्कम मिळविण्यासाठी संबंधित संशयित आरोपीनी सिद्धेश याला जबरदस्तीने पळवून नेले. त्यानंतर सिद्धेश याच्या नातेवाईकांकडून वेळोवेळी १८,०००, २५,०००, २५,००० रक्कम स्वीकारली. तसेच उर्वरित १ लाख २५ हजार रुपये द्या व मुलाला घेऊन जा, अशी धमकी देत त्या तरुणाला आपल्याकडेच बंदिस्त करून ठेवले.
या प्रकरणी संशयित आरोपी यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ३०८(२), १४२, १२६, १२७(३), १४०, ३(५)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास चालू आहे.
दुसरी घटना चिपळूण शहरातील काविळतळी येथे दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास काविळतळी (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे घडली. याप्रकरणी प्रकाश मार्तंडराव पवार (वय ७०, रा. काविळतळी) यांनी फिर्याद दिली आहे.
प्रकाश पवार, त्यांचा मुलगा शुभम (वय २९)यांचे संशयित आरोपी सौरभ चव्हाण व वैभव साकुंडे (दोघे रा. काळज, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा) याच्याशी पैशांची देणे-घेणे व्यवहार झालेला आहे. या कारणावरून संशयित आरोपींनी शुभम यास फोन करून चिपळूण येथे बिल्डिंगखाली बोलावून घेतले. त्यानंतर शुभम आपल्या वडिलांसोबत बिल्डिंगखाली आला असता संशयित आरोपी सौरभ चव्हाण व वैभव साकुंडे यांनी शुभम याला जबरदस्तीने फोर व्हीलर गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी नेले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम १४०(३), ३(५) प्रमाणे सौरभ चव्हाण व वैभव साकुंडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून चिपळूण पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान या दोन्ही घटनांमुळे चिपळूण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अपहरण झालेल्यांची सुखरूप सुटका करून आरोपिंना बेड्या ठोकण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.












