WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

सावर्डे विद्यालय ठरली ‘सुंदर शाळा’


सावर्डे विद्यालय ठरली ‘सुंदर शाळा’

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानात प्रथम क्रमांक

सावर्डे : महाराष्ट्र राज्य पुरस्कृत राज्यस्तरीय “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानाच्या टप्पा क्रमांक ३ मध्ये सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विशेष म्हणजे २०२३–२४ मध्ये या अभियानात सावर्डे विद्यालयाने विभागस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला होता.

शैक्षणिक वर्ष २०२५–२६ अंतर्गत दि. ३ नोव्हेंबर २०२५ ते दि. ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत या अभियानाचा टप्पा ३ राबविण्यात आला होता. राज्यभरातील शाळांमध्ये स्वच्छता, सुशोभीकरण, शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्मिती या निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. या सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सावर्डे येथील या विद्यालयाने कोल्हापूर विभागात अव्वल स्थान मिळवले.

या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम, उपाध्यक्ष प्रशांत निकम, उपाध्यक्षा युगंधराताई राजेशिर्के, उपाध्यक्ष डॉ. खतीब, कार्याध्यक्ष अनिरुद्धजी निकम, सेक्रेटरी महेश महाडिक तसेच संस्थेचे संचालक मंडळ आणि पदाधिकारी यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले आहे.

विद्यालयाच्या या यशात संस्थेचे पदाधिकारी, शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, सर्व शिक्षक व कर्मचारी, पालक, विद्यार्थी, हितचिंतक, शिक्षणप्रेमी आणि सावर्डे ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या उल्लेखनीय यशामुळे परिसरात समाधानाचे वातावरण असून, भविष्यातही शैक्षणिक गुणवत्तेत सातत्य राखण्याचा निर्धार विद्यालयाने व्यक्त केला आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!