‘त्या’ भिंतीवरचे ‘कमळ‘ गायब
वन विभागाची तातडीची कारवाई, नव्याने रंगरंगोटी
चिपळूण : शहरातील मार्कंडी परिसरात वन विभागाच्या कंपाउंड वॉलवर काढण्यात आलेले भाजप या राजकीय पक्षाचे चिन्ह अखेर काँग्रेस पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे हटविण्यात आले असून वन विभागाने यावर तातडीने कारवाई केली आहे. संबंधित भिंतीची नव्याने रंगरंगोटी करण्यात आल्याने हा वाद तात्पुरता निवळला आहे.

शासकीय मालमत्तेवर पक्षाचे चिन्ह रेखाटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली होती. जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, नगरसेवक साजिद सरगुरोह, नगरसेविका सफा गोटे, सुरेश पाथरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत तत्काळ कारवाईची मागणी केली होती. तसेच प्रांताधिकारी यांनाही निवेदन दिले होते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने संबंधित चिन्ह हटवून भिंतीला मूळ स्वरूप देण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
काँग्रेसकडून देण्यात आलेल्या निवेदनात शासकीय मालमत्ता ही सार्वजनिक असून तिचा कोणत्याही राजकीय प्रचारासाठी वापर करणे नियमबाह्य असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच या प्रकारामुळे प्रशासनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले होते.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने कारवाई करत भिंतीवरील चिन्ह पुसून टाकले आणि संपूर्ण भिंतीची नव्याने रंगरंगोटी केली. यासोबतच या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.












