WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

आंबा व काजू नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी दोन दिवसांची मुदतवाढ


आंबा व काजू नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी दोन दिवसांची मुदतवाढ

२३ मेपर्यंत अर्ज स्वीकारणार

चिपळूण : अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशासनाकडून दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी आता दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, शेतकऱ्यांना २३ मे २०२६ पर्यंत राहिलेले पंचनामे आणि संबंधित कागदपत्रे सादर करता येणार आहेत.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे विविध कारणांमुळे प्रलंबित राहिले होते. त्यामुळे कोणताही पात्र शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी आपले अर्ज व आवश्यक कागदपत्रे नेमणूक केलेल्या ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा करावीत. यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी तसेच ग्राम महसूल अधिकारी यांचा समावेश आहे. संबंधित अधिकाऱ्यांची यादीही प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, सोमवारपर्यंत अंतिम अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे अद्याप बाकी आहेत, त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने शेतकरी बांधवांना ही माहिती इतरांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही केले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे सांगितले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!