WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

कर्तव्य पथावर घुमला ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष


कर्तव्य पथावर घुमला ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष

महाराष्ट्राची सांस्कृतिक छाप

गणेशोत्सव, ढोलपथक आणि मूर्तीकारांच्या कलेने वेधलं देशाचं लक्ष

नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर भव्य लष्करी संचलनानंतर विविध राज्यांचे संस्कृतीदर्शक चित्ररथ सादर करण्यात आले. यामध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने विशेष आकर्षण निर्माण केले.

महाराष्ट्राच्या चित्ररथातून राज्यातील गणेशोत्सवाचे भव्य दर्शन घडवण्यात आले. अष्टविनायकांच्या प्रतिकृती, पारंपरिक वेशातील ढोल वाजवणाऱ्या मराठमोळ्या महिला, तसेच गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तीकारांच्या कलेचे सादरीकरण यामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख ठळकपणे समोर आली.
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख आणि लोकचळवळीचा उत्सव असून, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी या उत्सवाची सुरुवात केली होती. आज गणेशोत्सवाच्या माध्यमातून मूर्तीकार, सजावटकार, कलाकार, वादक यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. दरवर्षी या उत्सवातून सुमारे ६० ते ७० लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचे चित्ररथातून प्रभावीपणे मांडण्यात आले.

ढोलपथक आणि लेझीमसारख्या पारंपरिक कला, महिलांचा सहभाग आणि स्वदेशी व्यवसायाला चालना देणारा गणेशोत्सव हा ‘आत्मनिर्भर भारत’च्या संकल्पनेचा जिवंत आदर्श असल्याचा संदेश या चित्ररथातून देण्यात आला.

प्रजासत्ताक दिनी सादर होणाऱ्या चित्ररथांची निवड प्रक्रिया संरक्षण मंत्रालयाकडून अनेक टप्प्यांत केली जाते. देशातील विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालयांमधून निवडलेल्या या चित्ररथांमधून भारताची सांस्कृतिक विविधता आणि प्रगती अधोरेखित होते. यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाने आपल्या परंपरा, कला आणि अर्थव्यवस्थेचा सुरेख संगम सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!