ठाकरे बंधूंचा एल्गार ;
26 जुलैला मुंबईत शक्तीप्रदर्शन मोर्चा
केंद्र सरकारवर करणार जोरदार हल्लाबोल
मुंबई : NEET पेपरफुटी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ला आणि विविध स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहारांच्या निषेधार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी, 26 जुलै रोजी मुंबईत भव्य शक्तीप्रदर्शन मोर्चाची घोषणा केली आहे. हा मोर्चा शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा काढण्यात येणार असून, या आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरत असून, या आंदोलनात महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षही सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “26 जुलै रोजी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही शक्तीप्रदर्शन मोर्चा काढणार आहोत. देशभरातील विद्यार्थ्यांचा संताप केंद्र सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. हा केवळ एका परीक्षेचा प्रश्न नाही, तर देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न आहे. त्यामुळे पालकांनी देखील या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.
मोर्चा शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार असून, तेथे आंदोलनाची सांगता होईल. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, “सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करून सरकारला सुबुद्धी मिळावी, अशी विनंती करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा लढा आहे.”
राज ठाकरे यांनी यावेळी सरकारच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका करताना म्हटले की, “शेतकरी आंदोलन असो, मणिपूरमधील घटना असो किंवा विद्यार्थ्यांचे आंदोलन असो, सरकारने संवाद साधण्याऐवजी दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली. NEET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना किती मानसिक तणावातून जावे लागते, हे त्यांच्याच कुटुंबियांना माहिती आहे. मी यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना NEET संदर्भात इशारा दिला होता. आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, उद्या विद्यार्थी आत्महत्येच्या टोकाला जातील, असेही मी सांगितले होते.”
राज ठाकरे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीपलीकडे जाऊन थेट पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्रालयालाही लक्ष्य केले. “फक्त ट्विट करून जबाबदारी संपत नाही. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावले असते, त्यांचे म्हणणे ऐकले असते, तर परिस्थिती एवढी चिघळली नसती. हा सत्तेचा उद्दामपणा कशासाठी?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची आठवण करून देत राज ठाकरे म्हणाले, “त्या वेळी जबाबदारी स्वीकारली गेली होती. मग आज इतक्या मोठ्या शैक्षणिक घोटाळ्यानंतर जबाबदारी स्वीकारली जात नाही, हे का? तिसऱ्यांदा पेपरफुटी झाली. आम्ही आधीच केंद्रीय पद्धतीच्या परीक्षांबाबत सावध केले होते. पण सत्तेच्या अहंकारामुळे आमचे ऐकले गेले नाही.”
यावेळी आदित्य ठाकरे व अमित ठाकरे हे देखील उपस्थित होते. त्यांनीही परखडपणे आपली भूमिका मांडली.
दरम्यान, 26 जुलैचा मोर्चा हा केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नापुरता मर्यादित न राहता केंद्र सरकारच्या धोरणांविरोधातील व्यापक जनआक्रोशाचे प्रतीक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील विविध विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनाही या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता असल्याने या मोर्चाकडे राज्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.












