मोफत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
117 नागरिकांनी घेतला लाभ
चिपळूण : 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत दि. चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह प्रा. लि. बँक, चिपळूण यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर लाईफ केअर हॉस्पिटल, चिपळूण, उपजिल्हा रुग्णालय कामथे, तसेच NAB आय हॉस्पिटल, चिपळूण यांच्या सहकार्याने पार पडले. चिपळूणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या शिबिराचा 117 नागरिकांनी लाभ घेतला.
या आरोग्य शिबिरामध्ये विविध तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करण्यात आली. शिबिरात ईसीजी, रक्तदाब, मधुमेह तपासणी, कर्करोग तपासणी, अस्थमा (दमा) तपासणी, महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी, कान-घसा तपासणी, डोळ्यांची तपासणी अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आवश्यकतेनुसार रुग्णांना औषधे, इंजेक्शन व सलाईनही देण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी रुग्णसेवक व समाजसेवक श्री. शशिकांत मारुती चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या 15 वर्षांच्या प्रदीर्घ रुग्णसेवेत हे 1300 वे आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
दि. चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्री. मोहन मिरगल यांनी श्री. चव्हाण यांच्या वैद्यकीय व सामाजिक कार्याची प्रशंसा करत त्यांचा सन्मान केला. यापुढेही त्यांनी आरोग्य क्षेत्रात असेच उल्लेखनीय कार्य करत राहावे, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.
या शिबिराचा एकूण 117 नागरिकांनी लाभ घेतला असून, अनेक रुग्णांना पुढील तपासणी व शस्त्रक्रियेसाठी तज्ञ डॉक्टरांनी निवड केलेली आहे. यावेळी चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, उपाध्यक्ष धनंजय खातू, माजी अध्यक्ष सतीश अप्पा खेडेकर, संचालक ऍड. दिलीप उर्फ भाऊ दळी, समीर जानवलकर, सुनिल खेडेकर, रत्नदीप देवळेकर, विराज दळी, चिफ ऑफिसर अरविंद भागडे, नितीन चिंगळे, प्रशासन अधिकारी समीर जंगम तसेच बँकेतील अधिकारी, कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात हे शिबीर यशस्वीरीत्या पार पडले.











