WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

शिरवली–देवखेरकी लघुपाटबंधारे प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर!


शिरवली–देवखेरकी लघुपाटबंधारे प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर!

🔴तीन सार्वजनिक विहिरी जलमय

🔴घरांवर धोक्याचे सावट

🔴तातडीने उपाययोजना करा

🔴जि.प.सदस्या शिवानी सावंत यांचा प्रशासनाला इशारा

चिपळूण : शिरवली–देवखेरकी लघुपाटबंधारे प्रकल्पामुळे देवखेरकी (सुतारवाडी), देवखेरकी (भेलेवाडी) आणि शिरवली येथील ग्रामस्थांवर अभूतपूर्व संकट ओढवले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि घरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. गावातील पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेल्या तीन सार्वजनिक विहिरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पूर्णपणे जलमय झाल्याने शेकडो ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले आहे. दुसरीकडे वाढत्या जलपातळीमुळे देवखेरकी (सुतारवाडी), देवखेरकी (भेलेवाडी) आणि शिरवली येथील अनेक घरे धोक्याच्या छायेत आली असून, त्यामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करून धोकाग्रस्त परिसराची संयुक्त पाहणी, पर्यायी पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था, तसेच घरांना निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना त्वरित राबविण्याची मागणी केली आहे.

पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असा स्पष्ट इशारा जि.प. सदस्या सौ.शिवानी संदीप सावंत यांनी दिला आहे.

देवखेरकीचा हा प्रश्न केवळ तीन सार्वजनिक विहिरींचा नसून शेकडो ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि जीवित सुरक्षिततेचा आहे. त्यामुळे विलंब न करता तातडीने प्रभावी उपाययोजना करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी त्यांनी प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!