एका श्वासात १२० फूट खोल समुद्रात !
चिपळूणची ‘समृद्धी’ बनली भारताची फ्रीडायविंग प्रशिक्षक
चिपळूण : चिपळूणच्या भूमीने पुन्हा एकदा आपला ठसा जगभर उमटवला आहे. महाराष्ट्रातील एकमेव प्रमाणित फ्रीडायविंग प्रशिक्षक होण्याचा मान समृद्धी राजू देवळेकर हिने पटकावला आहे. चिपळूण शिवसेना उबाठा पक्षाचे माजी शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक राजू देवळेकर यांची ती कन्या असून, तिच्या या यशाने संपूर्ण कोकणाचा अभिमान उंचावला आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत, निसर्गाप्रति प्रेम, शिक्षणाविषयी आवड, प्रशिक्षक आणि आई- वडील यांच्या पाठबळावरच मी हे अत्यंत महत्त्वाचे शिक्षण घेऊ शकले असे समृद्धी देवळेकर हिने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चिपळूणची सुकन्या समृद्धी राजू देवळेकर हिने आपल्या धाडसी कर्तृत्वाने चिपळूणचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं आहे. समृद्धी आता प्रमाणित PADI फ्रीडायविंग इन्स्ट्रक्टर बनली असून, अशी मान्यता मिळवणाऱ्यांपैकी ती भारतातील मोजक्या व्यक्तींमध्ये एक आहे. फ्रीडायविंग ही एक अनोखी जलक्रीडा आहे. ज्यामध्ये कोणत्याही ऑक्सिजन सिलेंडरचा वापर न करता, फक्त एका श्वासावर खोल समुद्रात प्रवेश केला जातो. ही केवळ शारीरिक ताकदीची नाही, तर मानसिक स्थैर्य, आत्मनियंत्रण, आणि निसर्गाशी एकरूप होण्याची एक साधना आहे. समृद्धी सध्या एका श्वासावर तब्बल १२० फूटांहून अधिक खोल डाइव्ह करू शकते आणि ४ मिनिटांहून अधिक वेळ श्वास रोखून ठेवू शकते. ही एक अतुलनीय आणि अत्यंत दुर्मिळ क्षमता आहे.समृद्धीचं आयुष्य सुरुवातीला आकाशाशी जोडलेलं होतं.ती एक ट्रेनी पायलट होती. पण पंखांमधून पाण्यात उतरलेली तिची ही जीवनकथा फारच अद्वितीय आहे. समुद्राने तिला बोलावलं आणि तिने मागे वळून पाहिलंच नाही. त्या क्षणापासून तिने आपलं आयुष्य फ्रीडायविंगसाठी समर्पित केलं. नुकतीच ती फिलिपिन्समधून आंतरराष्ट्रीय पातळीवर फ्रीडायविंग कोर्सेस व कार्यशाळा घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील डायव्हर्स ऑफ विंगोरीय यांच्यासोबत प्रशिक्षण देण्यासाठी दाखल झाली आहे. तिच्याकडे भारत आणि जगभरातून विद्यार्थी येतात.खोल पाण्याशी एकरूप होण्यासाठी, श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या मर्यादा ओळखून त्याही पुढे जाण्यासाठी.
पायलटपासून फ्रीडायव्हर आणि आता प्रशिक्षक हा तिचा प्रवास खूपच प्रेरणादायक आहे. समृद्धीच्या या वाटचालीमुळे चिपळूणसारख्या लहानशा शहरातून आंतरराष्ट्रीय जलक्रीडा क्षेत्रात एक झळाळता तारा निर्माण झाला आहे. तिच्या यशाने तिच्या कुटुंबाचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढवला आहे. ती फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांना देखील खोल पाण्याशी नातं जोडण्यासाठी एक “ब्रिज टू द ओशन” बनली आहे. एका श्वासावर खोल समुद्रात प्रवेश करणारी समृद्धी आज अनेक तरुणांना दाखवत आहे की ध्येय, चिकाटी, आणि निसर्गाशी प्रेम केल्यास अशक्य काहीच नाही. समृद्धी देवळेकर एक नाव जे पुढील काळात भारतात फ्रीडायविंगच्या इतिहासात मोठं स्थान घेणार आहे, आणि आज तिचं सुरुवातीचं पाऊल चिपळूणमधून झेपावलं आहे.या संदर्भात भारतामध्ये समृद्धी लवकरच एक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे.फ्रीडाव्हिंग संदर्भात आपल्याला अधिंक माहिती हवी असल्यास समृद्धी देवळेकर यांच्याशी संपर्क करावा आणि
Instagram: shefromthe_sea या पेज वर फॉलो करा असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीयांमध्ये अपार क्षमता
समृद्धीचा ठाम विश्वास आहे की भारतीयांमध्ये फ्रीडायविंगसाठी अपार क्षमता आहे. आपल्याकडे असलेली मानसिक शांतता, योगाभ्यासाची परंपरा, शारीरिक सहनशक्ती आणि आत्मनियंत्रण या सर्व गुणांमुळे आपण या खेळात जागतिक स्तरावर आघाडी घेऊ शकतो. तिच्या मते भारतात फ्रीडायविंग अजून फारसा माहित नाही, पण योग्य मार्गदर्शन व संधी मिळाल्यास आपण उत्कृष्ट फ्रीडायव्हर्स आणि प्रशिक्षकही घडवू शकतो.












