फरशी स्टॉपवर विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!
🔴‘चढले की नाही’ न पाहताच एस.टी. धावते
🔴बसथांबा वगळल्याने विद्यार्थ्यांचे हाल
चिपळूण : खेड–चिपळूण मार्गावरील फरशी बसथांब्यावरून डी.बी.जे. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थी बसमध्ये व्यवस्थित चढले आहेत की नाही, याची खात्री न करताच एस.टी. बस घाईघाईने सुरू केली जात असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून होत आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा तोल जाऊन पडण्याची वेळ अनेकदा आली असून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
सकाळच्या महाविद्यालयीन वेळेत फरशी बसथांब्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. बस थांबल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसमध्ये चढण्यासाठी आवश्यक वेळ देणे अपेक्षित असताना, काही वेळा विद्यार्थी चढत असतानाच बस पुढे नेली जात असल्याचा आरोप होत आहे. गर्दीच्या वेळी एखादा विद्यार्थी खाली पडल्यास त्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ‘अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?’, असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
बसथांबा सोडून थेट उड्डाणपुलावरून बस पुढे!
फरशी बसथांब्यावर थांबण्याऐवजी काही एस.टी. बस थेट उड्डाणपुलावरून पुढे जात असल्याचीही विद्यार्थ्यांची तक्रार आहे. बसची वाट पाहणारे विद्यार्थी बस न थांबल्याने हताश होतात आणि पुढील बसची प्रतीक्षा करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही.
याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. महाविद्यालयात उशिरा पोहोचणे, व्याख्याने चुकणे आणि उपस्थितीवर परिणाम होणे, अशा समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.
गर्दीच्या बसमध्ये चढता आले नाही, तरी विद्यार्थ्यांचाच दोष?
समोर आलेल्या एस.टी.मध्ये प्रचंड गर्दी असल्याने काही विद्यार्थ्यांना त्यामध्ये चढणे शक्य होत नाही. अशावेळी मागून येणाऱ्या खेड–चिपळूण एसी बसमध्ये विद्यार्थी प्रवास करतात. मात्र, काही वाहकांकडून ‘तुम्ही आधीच्या बसमध्ये का बसला नाही?’ अशा स्वरूपाची विचारणा केली जात असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
विद्यार्थ्यांचा उद्देश कोणतीही विशेष सुविधा मागणे नसून सुरक्षितपणे आणि वेळेत महाविद्यालयात पोहोचणे एवढाच आहे. त्यामुळे त्यांना उलट जाब विचारण्याऐवजी परिस्थिती समजून घेण्याची गरज असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
एस.टी. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी
फरशी बसथांब्यावर महाविद्यालयीन वेळेत येणाऱ्या सर्व एस.टी. बसने नियमानुसार थांबावे, विद्यार्थ्यांना बसमध्ये सुरक्षितपणे चढण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, बसथांबा वगळून उड्डाणपुलावरून पुढे जाण्याचे प्रकार थांबवावेत आणि चालक-वाहकांनी विद्यार्थ्यांशी सौजन्यपूर्ण व जबाबदारीने वागावे, अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून होत आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करून ‘घाई’ करण्यापेक्षा काही क्षण थांबणे महत्त्वाचे आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर चौकशी आणि कारवाई करण्यापेक्षा त्याआधीच योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित एस.टी. प्रशासनाने या तक्रारींची गंभीर दखल घेऊन फरशी बसथांब्यावर प्रत्यक्ष पाहणी करावी आणि दोषी चालक-वाहकांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.










