खड्डे बुजवा, अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून ठेवू!
🔴शिवसेना उबाठाचे फैयाजभाई शिरळकर संतापले
🔴दोन दिवसांत खड्डे न बुजवल्यास राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयावर धडक देण्याचा इशारा

गुहागर : गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचाड ते चिपळूण उक्ताड या मार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांचे खंदे समर्थक, खाडीपट्टा उपविभाग प्रमुख फैयाजभाई शिरळकर यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे.
“खड्डे तातडीने बुजवा, अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून ठेवू,” असा आक्रमक इशारा शिरळकर यांनी दिला आहे. दोन दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची ठोस कार्यवाही झाली नाही, तर राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयावर धडक देण्यात येईल. तसेच, प्रश्न निकाली निघेपर्यंत एकाही अधिकाऱ्याला कार्यालयाबाहेर पडू दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोंढे–मिरजोळी दरम्यान दुचाकीस्वार गंभीर जखमी
दरम्यान, काल रात्री कोंढे ते मिरजोळी दरम्यान खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला मदत केली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक वाहनचालक जायबंदी होत असून, एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

“जीव गेल्यानंतर उपाययोजना करणार का?”
रस्त्याच्या दुरवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करत फैयाज शिरळकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. “अर्ज-विनंत्या करून आम्ही दमलो आहोत. दररोजचे हे मरण किती दिवस सहन करायचे? एखाद्याचा जीव गेल्यानंतर उपाययोजना करणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावरील खड्ड्यांकडे लक्ष वेधले जात असतानाही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित विभागाने तातडीने खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“आमच्या संयमाचा अंत पाहू नका!”
“आमच्या संयमाचा अंत पाहू नका. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. उद्रेक झाल्यास त्याला सर्वस्वी संबंधित अधिकारीच जबाबदार राहतील,” असा इशारा शिरळकर यांनी दिला.
दोन दिवसांत खड्डे बुजविण्याची कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल. प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
महामार्ग विभाग आता तरी जागा होणार का?
गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्ग हा कोकणातील महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र पाचाड ते चिपळूण उक्ताड या पट्ट्यातील खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे लक्षात न आल्याने अपघाताचा धोका अधिक वाढत आहे.त्यामुळे रस्ता दुरुस्तीची केवळ आश्वासने न देता प्रत्यक्षात तातडीने खड्डे बुजवावेत आणि मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता दोन दिवसांच्या अल्टिमेटमनंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग कोणती भूमिका घेतो आणि प्रत्यक्षात खड्डे बुजविण्याची कार्यवाही करतो का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.










