रामपूर, गुहागर रुग्णालयांची राज्याच्या आरोग्य संचालकांकडून पाहणी
आ. भास्करराव जाधव यांच्या मागणीची दखल
जागांचा प्रश्नही सुटला, तिन्ही रुग्णालये सुसज्ज उभी राहणार
चिपळूण : गुहागर विधानसभा क्षेत्रातील श्रेणीवर्धित ग्रामीण रुग्णालयांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आरोग्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या मागणीनुसार राज्याचे आरोग्य संचालक श्री. विजय कंदेवाड यांनी नुकतीच गुहागर आणि रामपूर (ता. चिपळूण) या ग्रामीण रुग्णालयांची पाहणी केली. त्यानंतर आमदार श्री. जाधव यांची भेट घेऊन या दोन्ही रुग्णालयांच्या जागेचा प्रश्न सुटल्याची माहिती त्यांना दिली. वावे (ता. खेड) रुग्णालयाच्या संदर्भातील सर्व प्रश्न आधीच मार्गी लागले असून इमारत बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री ना. श्री. प्रकाश आबिटकर यांनी मागील बैठकीत दिलेले असल्यामुळे आता ही सर्व रुग्णालये सुसज्ज उभी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुहागर मतदारसंघातील संबंधित रुग्णालयांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्याची मागणी आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी आरोग्यमंत्री ना. श्री. आबिटकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय त्यांनी करून घेतले. वावे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकाम निधीसाठी तात्काळ मा. मुख्यमंत्री यांना प्रस्ताव पाठविण्याचे आणि त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन ना. आबिटकर यांनी या बैठकीत दिले होते. त्याचवेळी हे अधिवेशन संपताच रामपूर, गुहागर रुग्णालयांचा जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ पुढील कार्यवाही करावी, अशी सूचना ना. आबिटकर यांनी आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांना केली होती. त्यानुसार ते आले होते.
दोन्ही ठिकाणच्या जागा ताब्यात घेण्याबाबत ठराव करून घेऊन त्या शासनाच्या नावावर करून घेण्याची जबाबदारी आ. श्री. जाधव यांनी विधानभवनात झालेल्या बैठकीत घेतली होती. त्यानुसार संबंधितांशी संपर्क साधून त्यांनी आपले काम आधीच सुरु केले होते. त्यामुळे दोन्ही रुग्णालयांच्या जागांचा प्रश्न देखील मार्गी लागण्यास आता कोणतेही अडथळे नाहीत, असे डॉ. कंदेवाड यांनी सांगितले. दोन्ही रुग्णालयांची पाहणी केल्यानंतर आमदार श्री. जाधव यांना भेटून त्यांनी सविस्तर माहिती दिली.
विरोधी पक्षाचा आमदार असतानादेखील आमदार श्री. जाधव यांचा प्रशासकीय यंत्रणेवर असलेला वचक वेळोवेळी पाहायला मिळतो. कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून मंत्रालयस्तरावरील सचिवांपर्यंत सर्वांमध्ये त्यांच्याविषयी असलेली आदरयुक्त भीती यामुळे कितीही मोठा प्रश्न समोर आला तरी तो ते सहजपणे सोडवतात. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा यानिमित्ताने आला. त्यांच्याबद्दल असलेल्या आपुलकी व जिव्हाळ्यापोटी ना. श्री. आबिटकर यांनी राज्याच्या आरोग्य संचालकांना गुहागर मतदारसंघात जाऊन त्यांची कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले, यातूनच सर्व काही स्पष्ट होते.
या पाहणीवेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कांबळे, डॉ. बळवंत, चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.










