आरक्षण उपवर्गीकरण कायद्याविरोधात चिपळूणमध्ये उद्या आरपीआय (आठवले)चे आंदोलन
🔺प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन सादर करणार
🔺नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
चिपळूण : अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)गटाच्या वतीने उद्या शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता चिपळूण येथील प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असून त्यानंतर निवेदन सादर करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. उमेश पवार यांनी अनुसूचित जाती समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रा. पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये अ, ब, क, ड अशा प्रकारे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय समाजात फूट पाडणारा असून, त्यामुळे विविध जातींमध्ये भेद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ओबीसी, मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यांवर निर्माण झालेल्या वादांप्रमाणेच आता अनुसूचित जाती समाजातही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच, भारतीय संविधानातील कलम ३४१ आणि ३४२ संदर्भातील तरतुदींमध्ये शब्दांचा चुकीचा अर्थ लावून आरक्षण व्यवस्थेवर परिणाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा प्रयत्न तातडीने थांबवण्यासाठी संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षण मिळविण्यासाठी समाजाने दीर्घकाळ संघर्ष केला असून, आता ते टिकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे दि. २४ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता चिपळूण येथील प्रांत कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात अनुसूचित जाती समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. डॉ. उमेश पवार यांनी केले आहे.












