मांडकीचा सुपुत्र मलकानगिरी चा जिल्हाधिकारी
चिपळूण, ता. १३ ः केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) २०२१ मधील परिक्षेत 237 वा क्रमांक मिळवलेल्या तालुक्यातील मांडकी येथील प्रथमेश अरविंद राजेशिर्के जिद्धीच्या बळावर इतिहास घडवला. सध्या प्रथमेश राजेशिर्के यांची ओडिशा राज्यातील नक्षलग्रस्त मलकानगिरी जिह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक असलेल्या या जिह्याची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. या संवेदनशील भागात ते कोकणचा ठसा उटमवतील असा विश्वास जिल्हाभरातून व्यक्त केला जात आहे.
कोकणच्या मातीतून घडलेले अनेक गुणी अधिकारी, वैज्ञानिक, साहित्यिक आणि उद्योजक देशभरात आपला ठसा उमटवत आले आहेत. आता या यादीत आणखी एका तेजस्वी नावाची भर पडली आहे. अत्यंत कमी वयात प्रशासनातील सर्वोच्च जबाबदारींपैकी एक मानल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारीपदावर विराजमान होणे ही मोठी कामगिरी समजली जाते. जिह्याचा विकास, कायदा सुव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, लोककल्याणकारी योजना आणि प्रशासनाचा समन्वय या सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर असतात. अशा वेळी प्रथमेश राजेशिर्के यांनी आपल्या कर्तृत्व, नेतृत्वगुण आणि कार्यक्षमतेच्या जोरावर एवढ्या कमी वयात हे पद भूषवणे ही निशातच उल्लेखनीय बाब ठरली आहे.
मांडकी ते दिल्ली… जिद्दीचा प्रवास
चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील प्रथमेश यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण डेरवण येथील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर सांगली येथील वालचंद महाविद्यालयात अभियांत्रिकी पदवी घेत असतानाच स्पर्धा परीक्षेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. कॅम्पस इंटरह्यूमधून पुण्यात नोकरी मिळाली, मात्र युपीएससीच्या अभ्यासासाठी वेळ अपुरा पडत असल्याने त्यांनी धाडसी निर्णय घेत नोकरीचा राजीनामा दिला. पुढे दीड वर्ष दिल्ली येथे राहून युपीएससीची सखोल तयारी केली. राज्य सरकारच्या ‘सारथी’ योजनेंतर्गत दिलेल्या परीक्षेत चांगले गुण मिळवत त्यांना दरमहा 13 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. या आर्थिक आधारावर त्यांनी दिल्लीतील अभ्यास सुरू ठेवला. अनेक अडचणींवर मात करत 2021 मध्ये 237 व्या क्रमांकाने त्यांनी यश संपादन केले.
मसुरी येथील दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर त्यांना ओडिशा केडर मिळाले. त्यानंतर त्यांनी बेरहामपूर महानगरपालिकेचे आयुक्त तसेच बेरहामपूर विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष म्हणून अतिरिक्त जबाबदारी सांभाळली. या काळात त्यांच्या कार्यपद्धतीची राज्य सरकारने दखल घेतली. ओडिशातील अनेक जिल्हे हे आदिवासीबहुल आणि भौगोलिकदृष्ट्या कठीण समजले जातात. चक्रीवादळ प्रवण राज्य असल्याने अशा भागात प्रशासन चालवताना अधिकाऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी राहतात. मात्र प्रथमेश राजेशिर्के यांनी या आव्हानांना संधीमध्ये रूंपांतरित केले. त्यांच्या पूर्वीच्या नियुक्त्यांमध्ये त्यांनी ग्रामीण विकास, शिक्षण, पोषण, आरोग्य आणि युवक सक्षमीकरण यावर विशेष भर दिला. दुर्गम गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रशासन लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. ‘फिल्ड ऑफिसर’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. विशेषत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. शाळांमधील उपस्थिती वाढवणे, विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देणे या बाबींमध्ये त्यांनी प्रभावी काम केले. अनेक गावांमध्ये स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा सुधारण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला.
मलकानगिरी हा जिल्हा दीर्घकाळ नक्षलवादामुळे संवेदनशील मानला जातो. मात्र अलीकडे तेथे सकारात्मक बदल घडत असून अनेक नक्षली आत्मसमर्पण करत आहेत. अशा संक्रमणकाळात विकासाला गती देण्यासाठी आणि आदिवासी भागात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने प्रथमेश राजेशिर्के यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी त्यांनी सांभाळलेल्या प्रत्येक जबाबदारीत यशस्वी ठरल्यानेच सरकारने त्यांच्यावर विश्वास दाखवला. राजेशिर्के यांची कार्यपद्धती लोकाभिमुख आहे. ते कार्यालयात बसून आदेश देण्यापेक्षा प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन परिस्थिती समजून घेण्यावर विश्वास ठेवतात. नागरिकांच्या तक्रारी तत्परतेने सोडवणे, पारदर्शक प्रशासन आणि संवेदनशील दृष्टीकोन यामुळे ते सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. अनेक वेळा त्यांनी अचानक शाळा, आरोग्य केंद्रे आणि सरकारी कार्यालयांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यामुळे प्रशासनातील शिस्त आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली.
कोकणातील रत्नागिरी जिह्यातून देशपातळीवर असा सन्मान मिळवणारा अधिकारी घडणे ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नियुक्तीनंतर प्रथमेश राजेशिर्के यांचे आमदार शेखर निकम, डॉ. तानाजी चोरगे, उद्योजक सचिन पाकळे, संजय पाकळे, पूजा निकम, युवा नेते उमेश राजेशिर्के तसेच नेटकेश्वर मित्र मंडळ, मांडकी, स्थानिक नागरिक, शिक्षक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी आनंद व्यक्त केला.











