WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

पंचायत समिती सदस्यांना हलक्यात घेऊ नका : सदस्यांचा इशारा


पंचायत समिती सदस्यांना हलक्यात घेऊ नका

मुंढे येथे पंचायत समितीची मासिक सभा,  कामातील दिरंगाइने अधिकाऱ्यांना इशारा

पिंपळी बुद्रुक, खडपोली, मालघर या स्मार्ट ग्रामपंचायतींचा गौरव

चिपळूण : पंचायत समिती सदस्यांनी गली तीन महिने राष्ट्रीय महामार्ग विभागाबाबत विविध समस्या मांडल्या, उपोषणाचा इशारा दिला, तरी या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही काम होत नाही. आता करतो, नंतर करतो, काम सुरू होइल, यापलिकडे उत्तर मिळत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाची देखील अशीच अवस्था आहे. त्यामुळे पंचायत समिती सदस्या अधिकाऱ्यांनी हलक्यात घेऊ नये, आता उपोषण नाही तर रास्ता रोको करू असा इशारा पंचायत समितीच्या सभेत सदस्यांनी दिला.

चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा मुंढे येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेच्या सभागृहात सभापती सुर्यकांत खेतले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती संदेश आयरे, गटविकास अधिकारी सौ. उमा घार्गे पाटील यांच्यासह सदस्य आणि विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आढाव्यात सदस्यांनी संताप व्यक्त केला. गेले तीन महिने सदस्य सातत्याने राष्ट्रीय महामार्ग बाबतच्या समस्या मासिक सभेत मांडत आहेत. प्रत्येकवेळी काम होइल, लवकरच सुरू केले जाईल, चार आठ दिवसात काम मार्गी लागेल, अशी आश्वासने दिली जातात. मात्र प्रत्यक्षात हालचाली होत नाही. पुन्हा नव्याने सभेत त्याच समस्या सभेत मांडाव्या लागतात. यावरून सदस्य सुभाष जाधव, विनोद भूरण, विनोद झगडे, गौरव पाटेकर, शौकत माखजनकर, सौ. उज्वला घाग, सौ. स्नेहा साळवी म्हणाल्या, तालुक्यातील समस्या सदस्यांच्या माध्यमातून मासिक सभेत मांडल्या जातात. या समस्यावर अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करायला हवी. मात्र प्रत्यक्षात अधिकारी दखल घेत नसल्याचे वास्तव आहे.

कामे होणारच नसतील तर सभेचा उपयोग काय, कशाला येथे समस्या मांडायच्या, अधिकाऱ्यांनो सदस्यांना हलक्यात घेऊ नका, अन्यथा महागात पडेल, असा इशारा देण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग विषयाबाबत आठवड्यात स्वतंत्र संयुक्त बैठक घेण्याचे ठरवण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढाव्यातही अशीच अवस्था दिसून आली. रोहयोचे अधिकारी सभेत येत नसल्याचे सदस्यांनी सांगितले. त्याचबरोबर महसूल विभागावरही सदस्यांनी ताशेरे ओढले. महसूलच्या अधिकाऱ्यांना मासिक सभेचे निमंत्रण देऊनही ते उपस्थित राहत नाहीत. महसूल बाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे महसूलच्या अधिकाऱ्यांना नोटीस देण्याचे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिले.

यानिमित्ताने तालुक्यातील गेल्या तीन वर्षात स्मार्ट ग्राम मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या मालघर, खडपोली आणि पिंपळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना सभापती, उपसभापती व बीडीओंच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

चिपळूण पंचायत समितीत गेली ४१ वर्षे हवालदार म्हणून सेवा बजावणारे अरविंद कृष्णा चव्हाण हे ३० जून रोजी सेवा निवृत्त होत आहेत. गेली ४१ वर्षे सर्वांशी मिळून मिसळून वागणारे, ग्रामस्थांना विनम्र सेवा देणारे, कामांचा वेळेत निपटारा करणारे आणि अजातशत्रू म्हणून ओळख असलेले हवालदार चव्हाण यांचा मासिक सभेच्या निमीत्ताने सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती, उपसभापती सर्व सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!