चिपळुणात आपलीच ताकद मोठी – राष्ट्रवादी कॉंग्रेस
चिपळूण ः आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुती व्हावी अशी आमची मनोमनी इच्छा आहे. यासाठी मित्रपक्षांमधील महायुतीबाबत चर्चा सुरू आहे. ग्रामिण भागात आपली ताकद मोठी आहे. तरिही युती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढेल आणि जिकेंल देखील. ९ जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समितीच्या १८ गणांत पक्षांकडे तगडे उमेदवार तयार आहेत. युती न झाल्यास सर्व जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली सावर्डेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
महायुतीमधील अपेक्षित युती आणि वाटाघाटी निष्फळ ठरल्या, तर दोन्ही निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली जाईल. मात्र वरिष्ठ नेते व पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करण्याचे मत सावर्डे येथील बैठकीत एकमुखाने मांडण्यात आले. आमदार शेखर निकम म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून आपण तालुक्यात सर्व स्तरांवर विकासकामे केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी मिळून कोकणासह संपूर्ण राज्यात जलदगतीने विकास घडवून आणला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास ठेवावा. वरून महायुतीबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत आणि त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र जर कोणत्याही कारणास्तव युती न झाल्यास राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढेल, असा इशारा त्यांनी दिला. बैठकीस प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम, सरचिटणीस जयंद्रथ खताते, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, रमेश राणे, दादा साळवी, विजय गुजर, सुरेश खापले, महिला जिल्हाध्यक्षा पूजाताई निकम, दिशा दाभोळकर, शहराध्यक्ष मिलींद कापडी, माजी सभापती सूर्यकांत खेतले, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, दिलीप माटे, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.












