WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

खेड येथे ९ पासून रंगणार नमन महोत्सव


खेड येथे ९ पासून रंगणार नमन महोत्सव

तीन दिवसात ८ नमन मंडळे करणार सादरीकरण

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाचा उपक्रम

खेड : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने यावर्षी दि. ९ ते ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता खेड येथील स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र या नाट्यगृहांमध्ये नमन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात तीन दिवसांमध्ये एकूण आठ नमन मंडळे आपली कला सादर करणार आहेत.

नमन लोककलेला चालना देण्यासाठी व या लोककलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा ही कला संवर्धन केली जावी, यासाठी शासनाच्या वतीने आता दरवर्षी नमन महोत्सवाचे आयोजन केले जाते. गतवर्षी चिपळूण येथे नमन महोत्सव पार पडला होता. नमन कोकणातील सर्वांच्या मनामध्ये घर करून बसलेली लोककला आहे. सण उत्सव आणि इतर कार्यक्रमात नमन कलेचे सादरीकरण मोठ्या प्रमाणात केले जाते. ही कला सर्वश्रुत पोहोचावी, या नमन कलेत वेगवेगळे बदल घडावेत रसिक आकर्षित व्हावे आणि ही लोककला कायमस्वरूपी जोपासली जावी यासाठी नमन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी खेड येथील स्व.मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र या नाट्यगृहामध्ये प्रथमच नमन महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. दिनांक ९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रथम या नमन महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते केले जाईल. त्यानंतर या ९ तारखेला दोन नमन मंडळे आपली कला सादर करणार आहेत.

सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी प्रथम काळेश्वरी नाट्य नमन मंडळ मंबई, आणि नवलाई नमन मंडळ निवळी रत्नागिरी या नमन मंडळांचा कार्यक्रम सादर होईल. त्यानंतर मंगळवार, दि. १० फेब्रुवारी श्री सोंबा राघोबा राधाकृष्ण नमन मंडळ मोर्डे गवळीवाडी संगमेश्वर, श्री हनुमान प्रासादिक भजनी भारुड मंडळ मांडकी खुर्द, चिपळूण आणि कालकाई देवी रिमिक्स नमन मंडळ वाटद, रत्नागिरी यांचे सादरीकरण होणार आहे.
बुधवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी श्री आई महाकाली नमन मंडळ कोलधे कुंभारवाडी लांजा, राजहंस नमन मंडळ वरवेली रांजाणेवाडी गुहागर आणि कोकण नमन कलामंच रत्नागिरी यांचे सादरीकरण होईल.

तीन दिवसीय नमन महोत्सवामध्ये एकूण आठ नमन मंडळांना सादरीकरणाची संधी प्राप्त झालेली आहे. ही नमन मंडळे आपली कला रसिकांसमोर सादर करणार आहेत. यामध्ये गण, गवळण आणि इतर सादरीकरण सुद्धा दाखवण्यात येईल. प्रत्येक मंडळ आपापल्या परीने नमन सादर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. खरंतर नमन लोककला हिला राजाश्रय मिळावा यासाठी नमन मंडळाच्या दोन्ही संस्था प्रयत्न करत आहेत. शासनाने नमन महोत्सव सुरू केल्यामुळे किमान दरवर्षी नमन मंडळांना कला सादर करण्यासाठी संधी उपलब्ध होते. त्यातून वेगवेगळे कलाकार, त्यांचा अभिनय, उत्कृष्ट संगीत, वेशभूषा ,रंगभूषा प्रकाशयोजना यांची विविधता पाहायला मिळते. या नमन महोत्सवाला सर्व रसिकांनी उपस्थित राहून सर्व कलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!