WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

ना. आशिष शेलार १५ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर


ना. आशिष शेलार १५ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

चिपळुणातील कार्यकर्ता मेळावा, वाशिष्ठी डेअरी पाहणीसह विविध कार्यक्रम

चिपळूण : महाराष्ट्राचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री ना. अॅड. आशिष शेलार हे बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी येथे विविध शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

दौऱ्याची सुरुवात पहाटे मुंबई येथून वंदे भारत एक्सप्रेसने होणार असून, सकाळी ८.४४ वाजता खेड रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन होईल. तेथे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते खेड येथील भाजप मंडळाध्यक्ष श्री. विनोद चाळके यांच्या निवासस्थानी भेट देतील. यावेळी आमदार प्रमोद जठार हे देखील उपस्थितीत राहणार आहेत.

यानंतर ना. शेलार सकाळी १० वाजता चिपळूण येथील वाशिष्ठी डेअरीची पाहणी करणार असून, स्थानिक पातळीवरील दुग्ध व्यवसाय व विकासासंदर्भातील माहिती घेणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता बहादूरशेख नाका येथील सहकार भवनात भारतीय जनता पक्ष रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्याच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभात ते मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, मोर्चा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांसाठी हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.

यानंतर दुपारी भाजप जिल्हा कार्यालयाला भेट देऊन पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर ते संगमेश्वरकडे रवाना होतील. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर जाखादेवी परिसरातील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांची पाहणी करून पुरातत्त्व विभागाकडून माहिती घेणार आहेत.
सायंकाळी रत्नागिरी शहरात आगमनानंतर नमन व जाखडी कलाकारांच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहून स्थानिक लोककलेचा गौरव करतील. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कबड्डी दिन कार्यक्रमात तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सांगीतिक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत. रात्री कोकण कन्या एक्सप्रेसने ते मुंबईकडे प्रस्थान करणार असून, १६ जुलै रोजी पहाटे मुंबईत दौऱ्याची सांगता होईल.

भाजप रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्याच्या वतीने सर्व पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सहकार भवन, बहादूरशेख नाका, चिपळूण येथे वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन दक्षिण व उत्तर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत यादव आणि सतीश मोरे यांनी केले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!