रमेश कदम पालकमंत्र्यांचे डमी उमेदवार – लियाकत शाह
चिपळूण ः युतीचे उमेदवार उमेश सकपाळ व आघाडीचे उमेदवार हे पालकमंत्र्याच्या सुचनेनुसारच नगरपरिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सकपाळ हे मुख्य उमेदवार तर कदम हे डमी उमेदवार आहेत. या दोघांपैकी जो निवडून येईल, त्यांच्या पाठीशी पालकमंत्री उभे राहणार आहेत. याविषयी दोन महिने आधीच बैठका झाल्या. त्याचवेळी आपल्याला निवडणूकीतून बाद करण्याचा डाव रचला गेला. त्यात काही क़ॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांचाही हात असल्याचा आरोप नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार लियाकत शाह यांनी पत्रकार परिषदेत केला.
चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणूकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील विविध भागात कॉर्नर सभा सुरू आहेत. शहरातील पेठमाप येथील सभेत आघाडीचे उमेदवार रमेश कदम यांनी शाह यांना लक्ष केले. त्याला उत्तर देताना शाह म्हणाले की, गेली अडीच वर्षे नगराध्यक्षपदासाठी मी प्रयत्न करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकाशी संपर्क साधून काम करत आहे. मात्र आता एैन निवडणुकीत आपल्या उमेदवारीमुळे विरोधकांना अडचण निर्माण झाली. यातून त्यांनी एकत्रीत येऊन आपल्याला निवडणुकीतून बाद करण्याचा डाव रचला. रत्नागिरी पाली येथे सुरवातीच्या बैठका झाल्या. त्यानंतर चिपळुणातही एक दोन बैठका घेण्यात आल्या. त्यामध्ये युतीकडून सकपाळ यांच्या नावावर शिक्का मोर्तब करताना रमेश कदम यांच्या डमी उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला. हे दोन्ही उमेदवार पालकमंत्र्यांचेच असून यातील जो निवडणून येईल तो पालकमंत्र्याचा नगराध्यक्ष असणार आहे, असा आरोप केला.
कधी नव्हे तो या निवडणूकीत पैशाचा पाऊस पाडला जात आहे. मतदारांना नको ती अमिषे दाखवून आकर्षीत केले जात आहे. मात्र आताची निवडणूक नेत्यांची राहिली नसून ती जनतेने हाती घेतली आहे. त्यामुळे आपला विजय हा निश्चीत असल्याचा दावा शाह यांनी केला.












