सोनगावमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रित पाणी
ग्रामस्थ आणि मच्छीमारांमध्ये संताप, तातडीच्या कारवाईची मागणी
खेड : लोटे एमआयडीसी परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रविवारी (दि. १२ जुलै) दुपारच्या सुमारास सोनगाव परिसरात काही रासायनिक कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात पिवळ्या रंगाचे रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमारांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, प्रदूषण नियंत्रण यंत्रणेने तातडीने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

घटनेची माहिती मिळताच कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीचे समन्वयक भरत लब्ध्ये आणि तुळशीराम पवार यांनी तातडीने सोनगाव येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी दूषित पाण्याचे नमुने (सॅम्पल) गोळा केले तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांच्या तक्रारी व संतप्त भावना जाणून घेतल्या.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे वारंवार रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने नदीचे पाणी दूषित होत असून मत्स्यसंपत्ती, पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अनेकदा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या पाहणीवेळी सोनगावच्या सरपंच भारती पडवळ, मच्छीमार नेते दिलीप दिवेकर, मंगेश कासेकर, प्रकाश दिवेकर, स्वप्निल पडवळ, विनायक कासेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, सोमवारी दुपारी सुमारे १२.३५ वाजता भरत लब्ध्ये यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) चिपळूण येथील प्रादेशिक अधिकारी श्री. कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. घटनास्थळावरील पाहणीचा व्हिडिओही त्यांना पाठविण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सोनगाव येथे प्रत्यक्ष पाहणी करून दूषित पाणी सोडणाऱ्या रासायनिक कंपन्यांचा शोध घ्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यानुसार एमपीसीबीचे अधिकारी सोनगाव तसेच लोटे एमआयडीसी परिसरात पाहणी करणार असल्याची माहिती देण्यात आली.
सोनगावमध्ये पुन्हा घडलेल्या या प्रकारामुळे लोटे एमआयडीसीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करून अशा घटनांना कायमचा आळा घालावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.










