चिपळूण पंचायत समितीतर्फे चारसुत्री भात पीक लागवड स्पर्धेतील शेतकऱ्यांचा गौरव
मुर्तवडे ग्रामपंचायतीने उभारले 41 साखळी बंधारे
शिरगाव ग्रामपंचायतीत कृषी दिनाचे आयोजन
चिपळूण – तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीत पंचायत समिती तर्फे कृषी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त तालुक्यात सर्वाधिक 41 कच्चे साखळी बंधारे उभारणाऱ्या मुर्तवडे ग्रामपंचायतिचा सन्मान केला. तसेच चारसूत्री भात पिक लागवडीत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणारे शिरगावचे माजी सरपंच आणि प्रगतशील शेतकरी अनिल शिंदे यांचा गौरव करण्यात आला.
शिरगाव येथे बुधवारी समिती पंचायत समितीच्या वतीने कृषी दिनाचे आयोजन केले होते. यावेळी सभापती सूर्यकांत खेतले म्हणाले, कृषी विकासासाठी शासनाने विविध योजना आखल्या आहेत. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरताना सेंद्रिय शेतीला चालना द्यावी. प्रगत तंत्रज्ञानाची कास धरून वाटचाल करावी. शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवडीसाठी रोजगार हमीची योजना आहे. या योजनेतून फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. यावेळी गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांनीही पंचायत समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली
या निमित्ताने शिरगाव येथे विविध रोपांची लागवड करण्यात आली. गतवर्षी मुर्तवडे ग्रामपंचायत ने सर्वाधिक 41 कच्चे बंधारे उभारले. त्यामुळे मुर्तवडे चे ग्रामपंचायत अधिकारी बजरंग हराळे आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा महिला व बालकल्याण सभापती मयुरी शिर्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
चार सुत्री भात लागवड पीक स्पर्धेत तालुक्यात शिरगाव येथील माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी अनिल शिंदे यांनी प्रथम, तर मोरवणे येथील संतोष शिंदे यांनी द्वितीय आणि शिरगाव येथील संतोष नाचरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या तिन्ही शेतकऱ्यांचा पंचायत समितीच्या वतीने गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. मयुरी शिर्के, उपसभापती संदेश आयरे, जिल्हा परिषद सदस्य नेहा रहाटे, पंचायत समिती सदस्य विनोद झगडे, सदस्या सौ. अर्चना साळवी, सरपंच नीता शिंदे, उपसरपंच श्री. कोलगे, सदस्य उमेश चिपळूणकर, सहायक गट विकास अधिकारी प्रमोद केळसकर, विस्तार अधिकारी भास्कर कांबळे, मिलिंद केळसकर, कृषी विस्तार अधिकारी अमोल पाटील, के.डी.पवार, पदमजा खटावकर, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे, ग्रामपंचायत अधिकारी सौ. भाग्यश्री जाधव तसेच शेतकरी बांधव आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.












