पीडित अल्पवयीन मुलीला न्याय द्या!
मंदार कदमला कठोर शासन करा
जिजाऊ ब्रिगेडचे पोलिसांना निवेदन
चिपळूण : तालुक्यातील कापसाळ येथील मंदार कदम नावाच्या संशयित आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ बुधवारी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने चिपळूण पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.निवेदनात संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचार ही अत्यंत गंभीर बाब असून अशा घटना समाजात पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने तत्काळ व प्रभावी पावले उचलावीत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण, जिल्हा सचिव पूर्वा तांदळे, जिल्हा कायदेशीर सल्लागार अॅड. वृषाली सावंत, खेड तालुका अध्यक्ष रोहिणी मोरे, चिपळूण शहर उपाध्यक्ष अपूर्वा गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती कदम व पूनम भोजने यांच्यासह अन्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
जिजाऊ ब्रिगेडने या प्रकरणी आरोपीला कोणतीही माफी न देता कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून पीडित मुलीला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.












