WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

कोहलीची ‘विराट’ खेळी व्यर्थ; न्यूझीलंडचा विजय


कोहलीची ‘विराट‘ खेळी व्यर्थ; न्यूझीलंडचा विजय

भारताला मालिका गमवावी लागली

इंदोर : इंदोरच्या होळकर स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर ४१ धावांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला. विराट कोहलीच्या झुंजार शतकानंतरही भारताला पराभव पत्करावा लागला असून या पराभवासह भारताने ही एकदिवसीय मालिका देखील गमावली आहे.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाने भारतासमोर ३३८ धावांचे आव्हान उभे केले. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी अप्रतिम फलंदाजी करत शतके झळकावली. दोघांनीही भारतीय गोलंदाजांवर दबाव आणत धावांचा डोंगर उभारला. त्यांच्या दमदार खेळीमुळे न्यूझीलंडने निर्धारित ५० षटकांत मोठी धावसंख्या उभी केली.

३३८ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा केवळ ११ धावांवर माघारी परतला, तर शुबमन गिलने २३ धावा केल्या. मधल्या फळीत श्रेयस अय्यर (३) आणि केएल राहुल (१) झटपट बाद झाल्याने भारत अडचणीत सापडला.

अशा संकटाच्या क्षणी विराट कोहलीने जबाबदारी स्वीकारत एकाकी झुंज दिली. कोहलीने १२४ धावांची दर्जेदार शतकी खेळी करत भारतीय डाव सावरला. त्याला नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांनी मोलाची साथ दिली. नितीश रेड्डीने ५७ चेंडूंमध्ये २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५३ धावांची उपयुक्त खेळी साकारली. कोहली–नितीश जोडीने ८८ धावांची भागीदारी रचत भारताला सामन्यात परत आणले.

यानंतर विराट कोहली आणि हर्षित राणा यांच्यात ९९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली, ज्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. मात्र हर्षित राणा अर्धशतकी खेळीनंतर झेलबाद झाला आणि त्यानंतर भारतीय फलंदाजीला गळती लागली. अखेर भारताचा डाव ५० षटकांपूर्वीच आटोपला आणि ४१ धावांनी पराभव निश्चित झाला.

या विजयासह न्यूझीलंडने भारतात ऐतिहासिक कामगिरी करत मालिका आपल्या नावावर केली आहे. दुसरीकडे, विराट कोहलीचे शतक व्यर्थ ठरले असून भारतीय संघाच्या वरच्या फळीच्या अपयशामुळे या पराभवाची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!