राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा
🔴 कोकणातील रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
🔴 घाटमाथा भागात सतर्कतेचे आवाहन
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेल्या पावसाचा जोर आज (बुधवार) देखील कायम राहण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील विविध भागांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला असून पुढील काही दिवसांतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून घाटमाथा भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे शहरासाठी यलो अलर्ट, तर पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, घाटमाथा भागातील नागरिकांनी तसेच नदी, नाले आणि धरणांच्या परिसरात राहणाऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे, दरडी कोसळणे तसेच सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.











