गुहागरच्या बहुचर्चित गोल्डनमॅन विश्वास खरे खून प्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप
१२ वर्षांनंतर न्याय; चिपळूण अतिरीक्त सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
गुहागर : गुहागर येथील बहुचर्चित ‘गोल्डनमॅन’ तसेच कासव संवर्धनासाठी ओळखले जाणारे विश्वास महादेव खरे यांच्या निर्घृण खून प्रकरणी तब्बल १२ वर्षांनंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. चिपळूण येथील अतिरीक्त सत्र न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी आरोपी अमोल चंद्रकांत गाढवे (रा. बोपखेल, पुणे) व किरण रामदास कुचेकर (रा. उत्तमनगर, पुणे) या दोघांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३९४ सह ३४ अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षाही न्यायालयाने ठोठावली.
विश्वास खरे यांची १ ऑक्टोबर २०१४ रोजी गुहागर येथील त्यांच्या ‘खरे प्लेझर पॉईंट’ या होमस्टेमध्ये अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोन पर्यटकांनी विळा व सुर्याने तब्बल २१ वार करून त्यांचा खून केला होता. त्यानंतर गळ्यातील सुमारे दहा तोळ्यांची सोन्याची साखळी लंपास करण्यात आली होती. या घटनेनंतर गुहागर पोलीस ठाण्यात खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर सुमारे तीन महिन्यांच्या तपासानंतर रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गुहागर पोलिसांनी आरोपींचा शोध लावला. जानेवारी २०१५ मध्ये अमोल गाढवे, किरण कुचेकर तसेच माहिती पुरवणारा साथीदार विष्णू किसन तनपुरे (रा. दिघी, पुणे) यांना अटक करण्यात आली. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
या खटल्याची सुनावणी प्रथम खेड सत्र न्यायालयात झाली. त्यानंतर खटला चिपळूण सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. प्रफुल्ल रामचंद्र साळवी यांनी अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडत एकूण ५१ साक्षीदार तपासले. त्यामध्ये मयताचे भाऊ गोविंद खरे व विवेक खरे, पत्नी विद्या खरे, आरोपींना घटनेच्या दिवशी मोटारसायकलवरून जाताना पाहणाऱ्या शर्मिला घुमे, चोरीची साखळी खरेदी करणारे सोनार विरसिंह चौहान, वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार, हस्ताक्षर तज्ज्ञ विनोद मेश्राम तसेच विविध मोबाईल कंपन्यांचे नोडल अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
या खटल्यातील काही महत्त्वाचे पंच व सोनार हे साक्षीदार न्यायालयात फितूर झाले होते. मात्र सरकारी वकील अॅड. साळवी यांनी त्यांच्या उलटतपासणीतून सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे सिद्ध केली. आरोपी घटनेच्या दिवशी गुहागर येथे उपस्थित होते व त्यानंतर पुण्यात परतल्याचे मोबाईल टॉवर सीडीआरच्या आधारे स्पष्ट झाले. तसेच आरोपी अमोल गाढवे याने चोरीची सोन्याची साखळी विकल्याचेही पुराव्यांद्वारे सिद्ध करण्यात सरकार पक्षाला यश आले. या सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरविले.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन गुहागर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी आणि रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील यांनी केला होता.
विशेष म्हणजे, अतिरीक्त सत्र न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी चिपळूण येथे नुकतीच नियुक्ती स्वीकारल्यानंतर या १२ वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्याचा सलग सुनावणीद्वारे अवघ्या सुमारे १२ दिवसांत निकाल दिला. त्यामुळे दीर्घकाळ न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या विश्वास खरे यांच्या कुटुंबीयांना अखेर दिलासा मिळाला.
निकालानंतर मयताच्या नातेवाईकांनी न्यायव्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करत, “१२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर न्याय मिळाला,” अशी भावना व्यक्त केली. तर सरकारी वकील अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी हा निकाल समाजात कायद्याचा धाक निर्माण करणारा असून अशा गंभीर गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया दिली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी प्रभावीपणे काम पाहिले. तसेच गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी साक्षीदार वेळेवर न्यायालयात हजर राहण्यासाठी सहकार्य केले. पैरवी अंमलदार म्हणून पोलीस हवालदार प्रदीप भंडारी व आशिष शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.











