गोवळकोट शाळा आरक्षण : पडद्यामागे नेमकं शिजतंय तरी काय?
चिपळूणमध्ये खळबळ; सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष
चिपळूण : गोवळकोट येथील शाळेचे आरक्षण उठविण्याच्या हालचालींमुळे चिपळूण शहरात आणि गोवळकोट परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. संबंधित जमिनीच्या मालकांनी शासनाकडे आरक्षण उठविण्याबाबत पत्रव्यवहार केल्याची माहिती समोर आली असली, तरी प्रत्यक्षात या संपूर्ण प्रक्रियेत काही पडद्यामागील व्यक्ती सक्रिय असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे नागरिक, शिक्षणप्रेमी आणि गोवळकोट ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
या विषयावर उद्या गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी चिपळूण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार असून, सभेत नेमका कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयात पडद्यामागून कोणाच्या हालचाली सुरू आहेत, याबाबत नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण प्रक्रियेत संबंधित जागेच्या मालक यांचे नाव समोर असले, तरी प्रत्यक्ष बैठका, पत्रव्यवहार आणि हालचालींमध्ये त्या कुठेही दिसून येत नाहीत. उलट काही अन्य व्यक्ती या विषयात सक्रिय असल्याचे दिसत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या व्यक्ती कोण आहेत? त्यांचा संबंधित जागेशी किंवा आरक्षणाशी नेमका काय संबंध आहे? अशा प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. या पार्श्वभूमीवर काही नगरसेवकही संभ्रमात असल्याची चर्चा आहे.
गोवळकोट ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता राखण्याची मागणी केली असून, आरक्षण उठविण्याची गरज नेमकी का निर्माण झाली, याचे स्पष्ट स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, चिपळूण नगरपालिकेचा सुधारित शहर विकास आराखडा 2018 मध्ये मंजूर झाला होता. सामान्यतः असा विकास आराखडा सुमारे 20 वर्षांच्या कालावधीनंतर बदलला जातो. त्यानंतर 2023 मध्ये संबंधित जागेवर शाळेसाठी दुसऱ्यांदा आरक्षण टाकण्यात आले. असे असताना, अवघ्या काही वर्षांत मंत्रालय स्तरावरून हे आरक्षण उठविण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा सवाल गोवळकोट ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांनी स्पष्ट भूमिका घेतली असून, “शाळेचे आरक्षण कायम राहावे, हीच आमची भूमिका आहे. सभेत कोणताही निर्णय झाला तरी आम्ही शेवटपर्यंत कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा देऊ,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
उद्याच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर नेमकी काय चर्चा होते, पडद्यामागील हालचालींचा उलगडा होतो का आणि नगरपालिकेची भूमिका काय राहते, याकडे आता संपूर्ण चिपळूण शहरासह गोवळकोट ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.












