स्व. गोविंदराव निकमांनी सर्वसामान्यांचे हित जपले – प्राचार्य राजेंद्र वारे
सावर्डे : सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणमहर्षी व सहकारमहर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम अत्यंत शांत, भावपूर्ण व चिंतनशील वातावरणात पार पडला. स्व. गोविंदराव निकम साहेब यांनी ज्योत ज्ञानाची व दौलत राष्ट्राची हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून संस्थेची स्थापना केली, सर्वसामान्यांचे हित जपले असे प्रतिपादन प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी स्व. निकम साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सहाय्यक शिक्षक अशोक शितोळे यांनी स्व. गोविंदराव निकम यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. “शिक्षण हे केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता माणूस घडवणारे माध्यम असावे,” ही साहेबांची विचारधारा आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि संस्था म्हणून आपण कोणती मूल्ये जपली पाहिजेत, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित साळवी यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन अशोक शितोळे व अमित साळवी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमीत्ताने स्व. गोविंदरावजी निकम यांच्या विचारांची आणि शिक्षणदृष्टीची उजळणी करणारा हा पुण्यतिथी कार्यक्रम विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित जीवनाचा संदेश देणारा ठरला.











