WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

बोलक्या चित्रकलेला विश्रांती!


बोलक्या चित्रकलेला विश्रांती!

‘घारे पेंटर’ यांचे निधन

चिपळूण : कुंचल्यातून भावना बोलक्या करणारे, रंगांमधून जीवन उभे करणारे आणि चिपळूणच्या सांस्कृतिक विश्वाला आपल्या कलेने समृद्ध करणारे नामांकित चित्रकार सिताराम जीवबा घारे उर्फ ‘घारे पेंटर’ यांचे बुधवारी सकाळी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चिपळूणच्या कला, संस्कृती आणि रंगमंच विश्वावर शोककळा पसरली आहे.

   मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील रहिवासी असलेले घारे पेंटर १९९० च्या दशकात व्यवसायाच्या निमित्ताने चिपळुणात आले आणि येथीलच झाले. चिपळूणकरांच्या मनात त्यांनी आपल्या कलेद्वारे अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या प्रत्येक चित्रात प्राण असायचा, प्रत्येक रेषेत जिवंतपणा दिसायचा. म्हणूनच त्यांच्या कलाकृतींना चिपळूणकरांनी नेहमीच भरभरून दाद दिली.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात आजही पाहायला मिळणारी अनेक तैलचित्रे ही त्यांच्या कुंचल्याची साक्ष देतात. जिल्ह्यातील विविध मंदिरांमधील भित्तीचित्रे, देवदेवतांची भावपूर्ण रूपे ही त्यांच्या प्रतिभेची अमूल्य देणगी आहे. डिजिटल युग सुरू होण्यापूर्वीच्या काळात हाताने रंगवलेले मोठमोठे फलक, तंतोतंत व्यक्तीचित्रे, देखावे तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता. फनफेअर, सर्कस, ऑर्केस्ट्रा, तमाशा, नमन, भारुड अशा विविध लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लागणारी चित्रे आणि फलक घारे पेंटर यांच्याशिवाय अपूर्णच वाटायची.

   चिपळूणमध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी साकारलेल्या कलाकृतींचीही विशेष दखल घेण्यात आली होती. त्यांच्या हातून रेखाटलेली चित्रे पाहताना ती जणू बोलत असल्याचा भास व्हायचा. म्हणूनच ते केवळ चिपळूणच नव्हे तर संपूर्ण उत्तर रत्नागिरीत ‘घारे पेंटर’ म्हणून ओळखले जात होते.

   गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. कोल्हापूर येथे उपचार सुरू असतानाच बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने एक संवेदनशील कलाकार हरपला असून, रंगांनी नटलेला एक काळा अध्याय कायमचा संपला आहे.

   त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार असून असंख्य विद्यार्थी, रसिक आणि त्यांची अजरामर कलाकृती हीच त्यांची खरी ओळख ठरणार आहे. घारे पेंटर यांचा कुंचला शांत झाला असला, तरी त्यांच्या रंगांची छाप चिपळूणच्या स्मरणात सदैव जिवंत राहील.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!