गाडीसाठी जमीन विकण्याचा हट्ट; नकार दिल्याने बापाला मुलाकडून मारहाण
रत्नागिरी : गाडी खरेदीसाठी जमीन विकण्याचा हट्ट धरलेल्या मुलाने नकार दिल्याच्या कारणावरून स्वतःच्या वडिलांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाडगाव येथील सागर निराज बिल्डिंगमध्ये उघडकीस आली आहे. ही घटना दि. १८ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजता घडली. या प्रकरणी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार राजेश पांचाळ असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद राजेश शंकर पांचाळ (वय ५०) यांनी दिली. यातील फिर्यादी व संशयित आरोपी हे वडील-मुलगा असून दोघे एकाच घरात राहतात. ओंकार याने वडिलांना त्यांच्या नावावर असलेली जागा विकून गाडी घेऊन देण्याची मागणी केली. मात्र फिर्यादी यांनी जागा विकण्यास नकार दिला. यावरून ओंकार हा संतापला व त्याने वडिलांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच “तुला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिली. या मारहाणीत वडील राजेश पांचाळ हे जखमी झाले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.














