तोंड दाबून गाडीत कोंबले ; दिव्यांगाचे फिल्मी स्टाईल अपहरण
चिपळुणात नगरसेवकाच्या चालकाला बेदम मारहाण
चिपळूण : शहरातील नगरसेवक साजिद सरगुरोह यांचे चालकाचे तोंड दाबून गाडीत कोंबून अपहरण करून त्याला गाडीतच अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. प्रेमविवाहाच्या वादातून पत्नीच्या नातेवाईकांनी हा प्रकार केल्याचा आरोप जखमी दिव्यांग युवकाने केला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरसेवक साजिद सरगुरोह यांचे चालक फैजान कर्जीकर (मजरे काशी, चिपळूण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते सोमवारी कामावर जात असताना मागून आलेल्या इनोव्हा कारमधून तिघेजण उतरले. त्यांनी फैजान यांचे तोंड दाबून जबरदस्तीने गाडीत कोंबले व गाडी गुहागर बायपासमार्गे वेगाने निघाली. काही अंतरावर गेल्यानंतर गाडीतच त्यांना मारहाण करण्यास सुरुवात झाली.
गाडी मुंबई–गोवा महामार्गावरून वालोपे–कळंबस्ते मार्गे चिरणी रस्त्याने लोटेपर्यंत नेण्यात आली. या दरम्यान सतत मारहाण करण्यात आली. एका टप्प्यावर एका महिलेने गाडीत येऊन शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच कोणत्यातरी वस्तूने डोळ्याजवळ जोरदार प्रहार करण्यात आला. सुदैवाने डोळा बचावला असला तरी डोळ्याच्या बाजूला व कानाखाली गंभीर दुखापत झाली आहे. जखमी फैजान कर्जीकर सध्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून ते मानसिकदृष्ट्या भयभीत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, आरोपींनी “आम्ही सांगतो तसे बोल, अन्यथा जाळून ठार मारू” अशी धमकी देत त्यांचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार केला. त्या व्हिडिओमध्ये “मी पत्नीला जबरदस्तीने पळवून नेले, अत्याचार केले व जबरदस्तीने लग्न केले” असे खोटे कबुलीजबाब देण्यास भाग पाडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच काही कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाव आणण्यात आला; मात्र त्यांनी सही करण्यास नकार दिला.
सदरची गाडी चिपळूणमधील एका कार्यालयात आणण्यात आली होती. दरम्यान नगरसेवक साजिद सरगुरोह व फैजान यांचे नातेवाईक पोलिसांत तक्रार देण्यासाठी धावले. ही माहिती मिळताच आरोपींनी फैजान यांना सोडून पलायन केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
फैजान कर्जीकर यांनी जानेवारी महिन्यात कोर्ट मॅरेज केले होते. या विवाहाला पत्नीच्या नातेवाईकांचा विरोध होता. पत्नीला सोडण्याचा दबाव टाकण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाणे येथे ताबिश पेचकर, समीर पेचकर, मुस्कान दलवाई (गोवळकोट रोड) व अमान नाडकर (खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.












