WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

पावसाळ्यातही मिळणार शुद्ध पाणी!


पावसाळ्यातही मिळणार शुद्ध पाणी!

🔷जॅकवेलमधील वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्याचे काम

🔷गढूळ पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी नगर परिषदेचा पुढाकार

🔷सभापती निहार कोवळे यांचा विश्वास

चिपळूण : शहरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात गढूळ पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्धार चिपळूण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केला असून, त्याअंतर्गत शहराच्या इतिहासात प्रथमच जॅकवेलमधील वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे.

पाणीपुरवठा समितीचे सभापती निहार कोवळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मान्सूनपूर्व आढावा बैठकीत गढूळ पाण्याच्या समस्येवर प्रभावी उपाय करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पावसाळ्यात नदीचे पाणी गढूळ झाल्यानंतर त्याचा परिणाम थेट पाणीपुरवठ्यावर होत असल्याचे लक्षात घेऊन जॅकवेलमध्ये साचलेल्या गाळाची साफसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोवळे म्हणाले की, “गढूळ पाणी येण्यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे जॅकवेलमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ. नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे, यासाठी हा गाळ हटविण्याचे काम प्राधान्याने करण्यात आले आहे. सभापती पदाच्या कार्यकाळात काही विशेष आणि लोकहिताचे काम करण्याचा आमचा संकल्प होता. त्याचाच भाग म्हणून ही मोहीम राबविण्यात आली.”

या कामामुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असून, पावसाळ्यातही नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “मी माझ्या चिपळूणकरांना एवढे नक्की आश्वस्त करू शकतो की, यावर्षी गढूळ पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात येईल आणि नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल,” असेही कोवळे यांनी सांगितले.

नगर परिषदेच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या समस्येवर दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!