WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या वडिलांचे मरणोत्तर देहदान


डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या वडिलांचे मरणोत्तर देहदान

समाजासाठी प्रेरणादायी निर्णय

रत्नागिरी, दि. 29 (जिमाका): जीवनभर साधेपणा, प्रामाणिकपणा आणि समाजभान जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या दिवंगत अच्युत शिवराम आठल्ये (वय ८९) यांनी मृत्यूनंतरही समाजासाठी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या तसेच कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे २८ जानेवारी रोजी करण्यात आले.

गुरुराज हाउसिंग सोसायटी, उद्यमनगर येथे वास्तव्यास असलेल्या कै. अच्युत आठल्ये यांचे २७ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र त्यांचे जाणे केवळ एका कुटुंबापुरते दुःख न राहता, समाजासाठी प्रेरणा देणारे ठरले आहे. त्यांच्या देहदानाच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात मोलाची मदत मिळणार आहे.

कै. अच्युत आठल्ये हे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचे वडील होत. त्यांची सून डॉ. रश्मी आठल्ये या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हे १७ वे मरणोत्तर देहदान ठरले.

साधेपणात महानता जपलेले जीवन
कै. अच्युत आठल्ये यांचा जन्म १३ जुलै १९३७ रोजी झाला असून त्यांचे मूळ गाव लांजा तालुक्यातील शिपोशी आहे. त्यांनी एल.आय.सी. मध्ये सलग ४० वर्षे प्रामाणिक सेवा बजावली. जीवनभर त्यांनी कर्तव्यनिष्ठा आणि सचोटीचे आदर्श जपले. त्यांना वाचनाची विशेष आवड होती. सामाजिक जाणिवेतून त्यांनी अनेक वाचनालयांना पुस्तके भेट देऊन ज्ञानदान केले. समाजकार्याची आवड, साधे जीवन आणि विचारशील स्वभाव हीच त्यांची खरी ओळख होती.

मृत्यूनंतरही शिक्षणासाठी देणगी
देहदान हा केवळ निर्णय नसून समाजासाठी दिलेले मोठे दान आहे. कै. अच्युत आठल्ये यांच्या या कृतीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील भावी डॉक्टरांना मानवी शरीररचनेचे ज्ञान मिळणार असून त्यांचा हा निर्णय अनेकांसाठी दीपस्तंभ ठरेल.

प्रक्रियेत मान्यवरांची उपस्थिती
मरणोत्तर देहदान प्रसंगी कै. अच्युत आठल्ये यांची मुलगी, जावई, नातेवाईक उपस्थित होते. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे, जिल्हा परिषद रत्नागिरी येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

ही संपूर्ण प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव तसेच विभागातील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा आदर्श
कै. अच्युत आठल्ये यांचे जीवन आणि त्यांचा देहदानाचा निर्णय हा समाजासाठी प्रेरणा देणारा आहे. मृत्यूनंतरही त्यांनी ज्ञान, सेवा आणि मानवतेचा संदेश दिला असून त्यांचे स्मरण कायम प्रेरणादायी ठरेल.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!