धडाडीचे नेतृत्व, विकासाची दूरदृष्टी आणि महाराष्ट्राचा आधारवड : स्व. अजितदादा पवार
चिपळूण ः महाराष्ट्राच्या आधुनिक राजकारणात ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा खोलवर उमटवला, स्पष्टवक्तेपणा आणि निर्णयक्षमतेच्या जोरावर प्रशासनाला वेग दिला, असे धडाडीचे नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार. त्यांच्या अपघाती निधनाने केवळ एक राजकीय नेता नव्हे, तर विकासाची दिशा देणारा, प्रशासनाचा मजबूत कणा ठरणारा आणि सर्वसामान्यांचा विश्वास असलेला नेता आपण गमावला आहे. 28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक अत्यंत दुःखद आणि न भरून येणारी पोकळी निर्माण करणारा दिवस ठरला.

सहकार क्षेत्रातील कामापासून ते राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा अजितदादांचा प्रवास हा संघर्ष, परिश्रम, सातत्य आणि स्वकर्तृत्वाचा आदर्श आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदापासून सुरू झालेला हा प्रवास त्यांनी कधीही वारशाच्या आधारावर नव्हे, तर स्वतःच्या कार्यक्षमतेच्या बळावर घडवला. शरद पवार साहेबांचा वारसा लाभला असला, तरी त्या वारशाला स्वतःच्या कर्तृत्वाने अधिक उंचीवर नेण्याचे काम दादांनी केले.
चिपळूण शहराला पुरापासून मुक्त करण्यासाठी सिंहाचा वाटा
चिपळूण शहराने २०२१ साली भयानक महापुराचा सामना केला. त्या संकटातून मिळालेला धडा लक्षात घेऊन भविष्यात अशी आपत्ती पुन्हा उद्भवू नये, यासाठी दूरदृष्टीने, तत्परतेने आणि ठाम निर्णयक्षमतेने पावले उचलणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार. तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून त्यांनी चिपळूणच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पुरनियंत्रणाच्या कामांना गती दिली.
२०२१ च्या महापुरानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढणे हे अत्यंत गरजेचे होते. या कामासाठी टप्पा क्र. १ अंतर्गत गोवळकोट ते बहादुरशेख नाका दरम्यान शासकीय जागेतील गाळ काढण्यासाठी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तब्बल रु. १० कोटी २८ लाख इतका मोठा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून सुमारे १३.७० लक्ष घनमीटर इतका गाळ काढण्यात आला, ज्यामुळे नदीपात्राची वहनक्षमता लक्षणीयरीत्या वाढली. याचाच पुढचा टप्पा म्हणून खेर्डी ते पोफळी दरम्यान ५.४१ लक्ष घनमीटर गाळ काढण्याच्या अंदाजपत्रकास जलसंपदा विभागाने रु. ४.८६ कोटी इतक्या रकमेची मान्यता दिली. सदर कामासाठी संपूर्ण निधी उपलब्ध झाला. त्याच बरोबर वाशिष्टी नदीवर नलावडा बंधारा बांधणे या कामासाठी सुमारे 35 कोटी निधी मंजूर झाला हे सर्व शक्य झाले ते केवळ अजितदादांच्या ठोस पाठपुराव्यामुळे आणि प्रशासकीय निर्णयक्षमतेमुळे. एकंदरीतच, चिपळूण शहराला पुरमुक्त करण्यासाठी अजितदादा पवार यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. गेल्या पावसाळ्यात चिपळूण शहर मोठ्या प्रमाणावर बाधित न होण्यामागे दादांनी वेळेवर दिलेल्या निधीचा आणि घेतलेल्या निर्णयांचा मोठा वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. चिपळूणकरांच्या जीवित, मालमत्तेच्या आणि शहराच्या भविष्यासाठी जे नेतृत्व खंबीरपणे उभे राहिले, त्या अजितदादांच्या प्रती चिपळूण शहर कायम ऋणी राहील.
स्पष्टवक्तेपणा आणि करारी निर्णयक्षमता – दादांची ओळख
राजकारणात टाळाटाळ, वेळकाढूपणा आणि धूसर भूमिका अनेकदा दिसून येतात. मात्र अजितदादांनी नेहमीच रोखठोक, स्पष्ट आणि निर्भीड भूमिका घेतली. “एक घाव, दोन तुकडे” ही कार्यशैली त्यांच्या नेतृत्वाची ओळख बनली. योग्य काम घेऊन आलेल्या कार्यकर्त्याला, अधिकाऱ्याला किंवा सर्वसामान्य नागरिकाला त्यांनी कधीही परत पाठवले नाही. त्यामुळेच प्रशासनावर त्यांची मजबूत पकड निर्माण झाली आणि वर्षानुवर्षे रखडलेली कामे वेगाने मार्गी लागली.
विकासाची व्यापक व दूरदृष्टीपूर्ण मांडणी
अजितदादांच्या नेतृत्वाखाली ज्या संस्था, विभाग आणि मतदारसंघ काम करत होते, तिथे विकासाचा वेग, शिस्त आणि पारदर्शकता दिसून आली. बारामती मतदारसंघ हा त्यांच्या विकासदृष्टीचा सर्वोत्तम नमुना मानला जातो. सहकारी साखर कारखाने, दूध संघ, बँका, शिक्षण संस्था, महानगरपालिका, जिल्हा परिषद, क्रीडा संस्था – जिथे जिथे दादांचा परिसस्पर्श झाला, तिथे त्या संस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि स्पर्धाक्षम बनल्या. संस्थांना कॉर्पोरेट लूक देणे, अद्ययावत इमारती उभारणे, आधुनिक व्यवस्थापन पद्धती राबवणे आणि कर्मचारी-केंद्रित धोरणे स्वीकारणे हे दादांचे वैशिष्ट्य होते. कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊनच त्यांच्याकडून उच्च कार्यक्षमतेची अपेक्षा ठेवण्याची कार्यसंस्कृती त्यांनी रुजवली.
मंत्री म्हणून दूरगामी आणि धाडसी निर्णय
जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी राज्यात विक्रमी सिंचनक्षेत्र निर्माण केले. वाढती लोकसंख्या, शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन जलनियोजनाला शिस्तबद्ध दिशा दिली. ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी लोडशेडिंगमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. वीज चोरी, गळती आणि वितरण हानी कमी करून राज्याला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे नेले.
वित्त मंत्री म्हणून जागतिक मंदीच्या काळातही त्यांनी राज्याचा महसूल वाढवला, करप्रणाली अधिक पारदर्शक केली आणि ई-रिटर्न प्रणाली यशस्वीपणे राबवली. मागास तालुक्यांसाठी मानव विकास मिशन, जिल्हा नियोजन समित्यांना वाढीव निधी, गुणवत्ताधारित अधिकारी बदल्या असे निर्णय प्रशासनाला नवी दिशा देणारे ठरले.
सामाजिक संवेदनशीलता आणि जनहिताची जाण
अजितदादांचे नेतृत्व केवळ कडक निर्णयांपुरते मर्यादित नव्हते. शेतकरी, विद्यार्थी, पीडित, अनाथ, सामान्य नागरिक यांच्याविषयीची त्यांची संवेदनशीलता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू होती. गुटखा बंदीसारखा कठोर पण आरोग्यदृष्ट्या क्रांतिकारी निर्णय, क्रीडा क्षेत्राला चालना, सांस्कृतिक वारशाचे संवर्धन, अल्पसंख्यांक व मागासवर्गीयांसाठी वाढीव निधी – हे सर्व त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे ठळक दर्शन घडवणारे निर्णय होते.
पक्षनिरपेक्ष विकास आणि संघटन कौशल्य
सत्तेच्या सर्वोच्च पदांवर राहूनही त्यांनी पक्षनिरपेक्ष विकासाचे तत्व जपले. त्यामुळेच मित्रपक्ष तसेच विरोधी पक्षातील नेत्यांमध्येही त्यांच्याबद्दल आदर होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद आणि युवक-युवतींना नेतृत्वाच्या संधी देण्याचा दृष्टिकोन विशेष उल्लेखनीय होता.
अजितदादा आणि सह्याद्री शिक्षण संस्था – अतूट नाते
अजितदादा पवार आणि सह्याद्री शिक्षण संस्था यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे व अतूट होते. संस्थेचा सुवर्ण महोत्सव 24 जानेवारी 2008 रोजी संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे होते. मात्र त्याच दिवशी नियतीने सह्याद्री परिवारावर घाला घातला आणि संस्थेचे संस्थापक गोविंदराव निकम यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या दुःखद प्रसंगी दादांनी सह्याद्री परिवारातील सदस्य म्हणून निकम साहेबांच्या अंत्यविधीपर्यंत संस्थेच्या प्रांगणात थांबून आधार दिला. निकम साहेबांना जशी माजी मुख्यमंत्री शरद पवारांची साथ लाभली, तोच वारसा पुढे नेत अजितदादा व सहयाद्रि शिक्षण संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम आणि सह्याद्री परिवारातील स्नेहबंध अधिक दृढ झाले. संस्थेच्या नवीन शाखा सुरू करणे, अडीअडचणीच्या काळात मार्गदर्शन करणे, निकम परिवाराकडे विशेष लक्ष देणे – हे दादांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. अजितदादांच्या निधनाने जशी महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, तशीच सह्याद्री शिक्षण संस्थेचीही अपूरणीय हानी झाली आहे. निकम आणि पवार कुटुंबाचे नाते हे केवळ राजकीय नव्हे, तर विश्वास, स्नेह आणि परस्पर आधाराचे होते. दादांच्या निधनाने पवार कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सह्याद्री परिवार सहभागी आहे. हे दुःख पचविण्याची ताकद परमेश्वराने त्यांच्या कुटुंबाला द्यावी, हीच सहयाद्रि परिवाराची ईश्वरचरणी प्रार्थना.













