बापरे! सराईत आरोपीकडे सापडली तब्बल 34 बँकांची एटीएम कार्ड
🔴रत्नागिरीत एटीएम फसवणूक करणारा जेरबंद
🔴गुजरातमधील अनेक गुन्ह्यांशी संबंध
रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एटीएम कार्ड अदलाबदल करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली असून त्याच्याकडून विविध बँकांची तब्बल ३४ एटीएम कार्डे जप्त करण्यात आली आहेत. आरोपीविरुद्ध महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास विश्वनगर, इंद्रधनू अपार्टमेंट परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये एका महिलेचे नवीन एटीएम कार्ड सक्रिय करण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी एटीएममध्ये उपस्थित असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने मदतीच्या बहाण्याने त्यांचे कार्ड स्वतःकडे घेतले. मोबाईलवर आलेला ओटीपी वापरून कार्ड सक्रिय केले आणि हातचलाखीने मूळ कार्ड स्वतःकडे ठेवून दुसरे एटीएम कार्ड महिलेला परत दिले. तसेच “सर्व्हर डाऊन असल्याने कार्ड सक्रिय होत नाही,” असे सांगून तो तेथून निघून गेला. काही वेळाने संबंधित महिलेच्या खात्यातून पैसे काढल्याचा संदेश मोबाईलवर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि सहायक पोलीस अधीक्षक अभिजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी
या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश गुन्हे प्रकटीकरण पथकाला दिले. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि परिसरातील तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला. अखेर तो रत्नागिरीतील मांडवी परिसरात आढळून आला. ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून फिर्यादीचे एटीएम कार्ड जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव धीरजकुमार मोहनलाल पांचाळ (वय ४१, रा. सद्गुरू अपार्टमेंट, एल.एच. रोड, सुरत, गुजरात) असे आहे. अधिक चौकशीदरम्यान तो रत्नागिरीत राहत असलेल्या ठिकाणी झडती घेतली असता विविध बँकांची ३४ एटीएम कार्डे पोलिसांनी जप्त केली.
तपासात आरोपीविरुद्ध गुजरातमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तसेच कोल्हापूरमध्ये फसवणूक, विश्वासघात आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो एटीएम फसवणुकीचा सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि सहायक पोलीस अधीक्षक अभिजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.












