दिव्याखाली अंधार!
चिपळूण बाजार पुलावरचे
सर्व एलईडी दिवे बंद
🔷वाशिष्ठी नदीवरील पुलावर अंधाराचे साम्राज्य
🔷स्थानिक नागरिक व वाहनधारकांत तीव्र संताप
✒️ सुशांत कांबळे
चिपळूण : शहरातील वाशिष्ठी नदीवरील नवीन बाजार पूल सध्या पूर्णतः अंधारात असून पुलावरील सर्व एलईडी पथदिवे बंद अवस्थेत आहेत. शहराच्या मध्यवर्ती व अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या पुलावर रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य पसरल्याने नागरिक, वाहनचालक तसेच स्थानिक व्यापाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नवीन बाजार पूल हा चिपळूण शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून या पुलावरून दररोज शेकडो वाहने, दुचाकी, चारचाकी तसेच पादचारी ये-जा करतात. मात्र पुलावरील सर्व एलईडी दिवे अचानक बंद झाल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. विशेषतः रात्री-अपरात्री या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना समोरचे वाहन, पादचारी किंवा रस्त्यावरील अडथळे दिसत नसल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, काही दिवसांपासून पुलावरील दिवे एका पाठोपाठ एक बंद होऊ लागले आहेत. मात्र नगर पालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. अंधारामुळे महिलांना, वृद्धांना व विद्यार्थ्यांना या पुलावरून जाताना भीती वाटत असल्याचेही नागरिकांनी नमूद केले.
दरम्यान, वाहनचालकांनीही या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “एवढ्या महत्त्वाच्या पुलावर प्रकाशव्यवस्था बंद असणे म्हणजे प्रशासनाचा गंभीर निष्काळजीपणा आहे. एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.या संपूर्ण प्रकाराकडे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी तातडीने लक्ष द्यावे, तसेच पुलावरील सर्व एलईडी दिवे सुरु करावे, अशी जोरदार मागणी नागरिक, वाहनधारक आणि स्थानिकांकडून केली जात आहे.











