WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

‘शिवरायांच्या गड-किल्ल्यां’कडे आता थेट महामार्ग!


‘शिवरायांच्या गड-किल्ल्यां’कडे आता थेट महामार्ग!

महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर’

🔷रायगड केंद्रस्थानी

🔷११ ऐतिहासिक गडकिल्ल्यांना दर्जेदार रस्ते, आधुनिक सुविधा आणि पर्यटनाला नवी झेप

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांपर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुखकर होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यात प्रथमच ‘फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर’ ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली असून, या प्रकल्पाअंतर्गत शिवरायांच्या ११ ऐतिहासिक गडकिल्ल्यांना राष्ट्रीय व राज्य महामार्गांशी थेट जोडणारे दर्जेदार रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड या संपूर्ण प्रकल्पाचा केंद्रबिंदू असेल.

या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील गडदुर्ग पर्यटनाला नवी दिशा मिळणार असून, पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था आणि ऐतिहासिक वारसा संवर्धन या तिन्ही क्षेत्रांना मोठी चालना मिळणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) मान्यता दिली असून, पुढील तीन ते चार महिन्यांत तो अंतिम करण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक विभागातील पाच किल्ल्यांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

गडापर्यंतचा खडतर प्रवास आता इतिहासजमा!
आजही अनेक गडकिल्ल्यांच्या पायथ्यापर्यंत जाणारे रस्ते अरुंद, खड्डेमय किंवा निकृष्ट अवस्थेत असल्याने पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ‘फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर’मुळे ही समस्या दूर होणार असून, राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गापासून थेट किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत दर्जेदार रस्त्यांचे जाळे उभारले जाणार आहे. त्यामुळे गडभेट अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी होईल.

फक्त रस्तेच नाहीत… पर्यटन सुविधांचाही विकास
या प्रकल्पात पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षित पार्किंग, दिशादर्शक फलक आणि किल्ल्यांचा इतिहास उलगडणारे माहिती फलक उभारले जाणार आहेत. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना दर्जेदार पर्यटनाचा अनुभव मिळणार आहे.

‘फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर’मध्ये हे गडकिल्ले
पुणे : लोहगड, राजगड, शिवनेरी
कोल्हापूर : पन्हाळा
सातारा : प्रतापगड
रत्नागिरी : सुवर्णदुर्ग
नाशिक : साल्हेर
सिंधुदुर्ग : विजयदुर्ग, सिंधुदुर्ग (मालवण)
रायगड : रायगड, खांदेरी

पर्यटकांसह स्थानिकांनाही मोठा फायदा
या प्रकल्पामुळे मुख्य महामार्गावरून थेट गडकिल्ल्यांपर्यंत पोहोचणे शक्य होणार असल्याने प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. एका दिवसात दोन-तीन गडकिल्ल्यांची सफर करणेही सहज शक्य होईल. पर्यटकांची संख्या वाढल्याने गडांच्या पायथ्याशी असलेल्या गावांतील हॉटेल व्यावसायिक, स्थानिक मार्गदर्शक, वाहनचालक, हस्तकला विक्रेते आणि लघुउद्योजकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही गडभेट अधिक सोपी होणार आहे.

पर्यटन, संवर्धन आणि विकासाचा ‘सुवर्ण त्रिवेणी संगम’
शिवरायांचा ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक पर्यटनाचा विकास साधण्याच्या दृष्टीने ‘फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर’ हा महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. गडांचे संवर्धन, पर्यटनाचा विस्तार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा प्रकल्प राज्याच्या पर्यटन इतिहासात मैलाचा दगड ठरण्याची चिन्हे आहेत.


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!