WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

‘एक राखी देशासाठी, एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रम


‘एक राखी देशासाठी, एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रम

🔷 ४ हजार राख्या भारतीय जवानांना पाठवण्याचा संकल्प

🔷समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांचा विशेष पुढाकार

चिपळूण : देशसेवेची भावना प्रत्येकाच्या मनात रुजावी आणि सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, या उद्देशाने ‘एक राखी देशासाठी, एक राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमाचे यंदा सलग पाचव्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे. आकले गावचे सुपुत्र, सामाजिक विकास ग्रुपचे मुख्य प्रवर्तक व समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या विशेष पुढाकारातून हा उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने राबविला जात असून, यावर्षी ४ हजार राख्या भारतीय सैनिकांना पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतीय जवानांना आपल्या मायभूमीत आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेण्याचा योग अनेकदा येत नाही. या भावनेतून प्रेरित होऊन समाजातील प्रत्येक घटकाने भारतीय सैनिकांप्रती आपुलकी व्यक्त करावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक गाव, वाडी, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक शाळा, महाविद्यालय, बचतगट तसेच ग्रामपंचायतींमधील महिलांकडून राख्या संकलित करून त्या भारतीय जवानांना पाठविण्यात येणार आहेत.

या उपक्रमासाठी माजी सैनिक, विद्यमान सैनिक, शिक्षक, विद्यार्थी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक
शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६

सकाळी १०.३० ते दुपारी १२.३०
लिटल चॅम्प्स इंग्लिश मीडियम स्कूल, जानवळे, ता. गुहागर

दुपारी १.३० ते २.३०
मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, दलवाई हायस्कूल, मिरजोळी, ता. चिपळूण

दुपारी ३.३० ते सायं. ५.३०
श्री सत्यनारायण मित्र मंडळ, कावळवाडी-तांबडवाडी समाजमंदिर, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी

या उपक्रमामागे समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न असून, देशभक्तीची भावना जागृत ठेवत भारतीय सैनिकांशी समाजातील प्रत्येक नागरिकाला भावनिकदृष्ट्या जोडण्याचा त्यांचा प्रयत्न दरवर्षी यशस्वी ठरत आहे. यंदा तब्बल ४ हजार राख्या भारतीय जवानांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आल्याने या उपक्रमाला व्यापक लोकसहभाग लाभण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!