गुरुपौर्णिमा निमित्ताने ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान
चिपळूण – नुकत्याच झालेल्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गेली अनेक वर्षे भजन, किर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करणार्या ज्येष्ठ वारकऱ्यांचा सरपंच श्री श्रीकांत मोहन निवळकर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सुरुवातीच्या काळात वाहतुकीची पुरेशी साधने नसतानाही पंचक्रोशीमध्ये दूरपर्यंत चालत जाऊन त्यांनी पारमार्थिक सेवा बजावली. आजही त्याच निष्ठेने आणि प्रेमाने अविरतपणे त्यांची सांप्रदायाची सेवा चालू आहे. त्यांच्या अनमोल योगदानामुळेच आज कुंभारवाडीतील बहुतांशी तरुण पिढी वारकरी संप्रदायाकडे वळली. कात्रोळी कुंभारवाडीतील वारकरी सांप्रदायाचे मानबिंदू समजले जाणारे ज्येष्ठ किर्तनकार -प्रवचनकार, गायक आदरणीय ह.भ.प. बाळकृष्ण उर्फ बारकु महाराज निवळकर यांच्यासोबत किर्तनकार -प्रवचनकार ह.भ.प. सुधाकर महाराज निवळकर, किर्तनकार -प्रवचनकार ह.भ.प. सुरेश महाराज निवळकर, किर्तनकार -प्रवचनकार ह.भ.प. सुधाकर महाराज गुजर, पखवाज वादक -गायक ह.भ.प. प्रमोदआण्णा निवळकर यांचा गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून कृतज्ञता म्हणून सन्मान करण्यात आला.










