WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

नाणार बॉक्साईट प्रकल्पाच्या जनसुनावणीला स्थगिती : ना. उदय सामंत


नाणार बॉक्साईट प्रकल्पाच्या जनसुनावणीला स्थगिती : ना. उदय सामंत

🔷आंबा कॅनिंगसाठी ५० रुपये दर

🔷सारथीचे विभागीय कार्यालय रत्नागिरीत सुरू होणार

रत्नागिरी : नाणार परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक शेतकरी, बागायतदार व खातेदारांनी तीव्र भूमिका घेतल्याने २० आणि २८ मे रोजी होणाऱ्या जनसुनावणीला प्रशासनाने स्थगिती दिली आहे. तसेच आंबा बागायतदारांना कॅनिंगसाठी मिळणारा कमी दर वाढवून प्रतिकिलो ५० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सारथीचे विभागीय कार्यालय रत्नागिरीत सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी तीन महत्त्वाच्या विषयांवर बैठका पार पडल्या. यामध्ये नाणार बॉक्साईट प्रकल्प, आंबा बागायतदारांच्या समस्या आणि सारथी विभागीय कार्यालयाच्या मागणीचा समावेश होता.
डॉ. सामंत म्हणाले की, नाणारमधील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असून, “लोकांची भूमिका तीच माझी भूमिका” असे आपण यापूर्वीच स्पष्ट केले होते. राजापूर पंचायत समितीनेही सुनावणी रद्द करण्याचा ठराव मंजूर केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. परिसरातील जवळपास शंभर टक्के खातेदार आणि बागायतदारांनी विरोधाची पत्रे प्रशासनाला दिल्याने २० आणि २८ मे रोजी प्रस्तावित जनसुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.“लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही प्रकल्प लादला जाणार नाही. स्थानिकांनी संमती दिल्यास पुढील निर्णय घेतले जातील. मात्र सध्या जनतेचा तीव्र विरोध लक्षात घेऊन सुनावणी स्थगित करण्यात आली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यानंतर स्थानिकांशी चर्चा करून पुढील भूमिका निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आंबा बागायतदारांनी कॅनिंगसाठी मिळणाऱ्या दराबाबत नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियावर दरवाढीच्या बातम्या फिरत असल्या तरी प्रत्यक्षात कोणतीही वाढ झालेली नव्हती, असे उत्पादकांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर प्रशासनाच्या उपस्थितीत आंबा बागायतदार आणि एक्सॉटिक देसाई कॅनिंग कंपनी यांच्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रतिकिलो ३२ रुपयांवरून दर वाढवून ५० रुपये करण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याची माहिती डॉ. सामंत यांनी दिली. या निर्णयाची अधिकृत नोंदही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सारथी संस्थेचे विभागीय कार्यालय रत्नागिरीत सुरू करण्याबाबतही सकारात्मक हालचाल सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील यांच्याशी चर्चा झाली असून, हा प्रस्ताव शासनाकडे सकारात्मक पद्धतीने पाठविण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुविधा सुरू करण्याबाबतही सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी रत्नागिरी नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या कामाचाही आढावा घेतल्याचे सांगितले. अलीकडील पावसामुळे कामात काहीसा विलंब झाला असून, लोकार्पणासाठी आणखी सात ते आठ दिवस लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले. “महाराष्ट्रातील ब वर्ग नगरपालिकांमध्ये आदर्श ठरेल अशी कॉर्पोरेट धर्तीवरील इमारत उभी राहिली आहे,” असे ते म्हणाले.

जिल्ह्यातील विविध भाड्याच्या कार्यालयांना एकत्र आणण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सध्याच्या प्रशासकीय इमारतीसमोरील इमारतीत आधुनिक पद्धतीने सेतू कार्यालय सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांची होणारी गर्दी आणि गैरसोय लक्षात घेऊन अधिक प्रशस्त व सुसज्ज सुविधा उभारण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत नव्या प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण होऊन ती नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!