WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

लक्ष्मी ऑरगॅनिकला टाळे ठोका : प्रदूषणाविरोधात स्वाक्षरीतून एल्गार


लक्ष्मी ऑरगॅनिकला टाळे ठोका : प्रदूषणाविरोधात स्वाक्षरीतून एल्गार

कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीच्या महिला आघाडीची मोहीम

चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाच्या प्रश्नावर आता नागरिकांचा संताप उफाळून येत असून, “लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी त्वरित बंद करा” या प्रमुख मागणीसाठी कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीच्या महिला आघाडीतर्फे रविवारी स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त सुरुवात झाली. शहरातील कै. अण्णासाहेब खेडेकर संकुल येथे सुरू झालेल्या या मोहिमेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून, पहिल्याच दिवशी हजारो नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने लोटे औद्योगिक वसाहतीमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाच्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेषतः पिफास (PFAS) उत्पादन करणाऱ्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीवर कारवाई करून कंपनी बंद करण्याची मागणी समितीकडून सातत्याने करण्यात येत आहे. परिसरातील हवा, पाणी आणि पर्यावरण धोक्यात आल्याचा आरोप करत समितीने यापूर्वी मोर्चे, धरणे आंदोलन आणि विविध जनजागृती उपक्रम राबवले आहेत.

शासन आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी आता समितीने स्वाक्षरी मोहिमेचा मार्ग स्वीकारला असून, ही मोहीम १२ मेपर्यंत चालणार आहे. चिपळूणनंतर अन्य तालुक्यांमध्येही ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

महिला आघाडीच्या वतीने आयोजित या मोहिमेचे उद्घाटन हुसेन दलवाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समितीचे भरत लब्धे, पंकज दळवी, तुळशीराम पवार, शहानवाज शहा, अझिम सुर्वे, फैसल देसाई, इब्राहिम दलवाई, सुमती जांभेकर, रविना गुजर, डॉ. रेहमत जबले, स्वाती भोजने, नगरसेविका सफा गोठे, तृप्ती कदम, शामिना परकार, रेहाना बिजले, विणा जावकर, स्नेहल चव्हाण, शमा जाधव, सईदा शेखदारे, नसरिन खडस आदी उपस्थित होते.

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “औद्योगिक विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.”


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!