दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा राज्यात अव्वल
राज्याचा निकाल ९२.०९ टक्के; मुलींचे पुन्हा वर्चस्व
पुणे / मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) अर्थात दहावी परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून कोकण विभागाने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल ९७.६२ टक्के लागला असून बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणची परंपरा कायम राहिली आहे.
यंदाही मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी करत निकालात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मुलींचा निकाल ९४.९६ टक्के लागला असून मुलांचा निकाल ९०.५६ टक्के नोंदवला गेला आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा राज्याचा निकाल सुमारे दोन टक्क्यांनी घसरल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी आणि राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग यांनी पत्रकार परिषदेत निकालाची अधिकृत माहिती दिली.
राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या नऊ विभागांतील १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख ५५ हजार ०२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
निकालाच्या वेळेबाबतही बोर्डाने शेवटच्या क्षणी महत्त्वाचा निर्णय घेतला. सुरुवातीला दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, निकालाच्या वेबसाईटवर वाढणारा संभाव्य ताण लक्षात घेता विद्यार्थ्यांना सकाळी ११.३० वाजल्यापासून निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
यंदाच्या निकालात कोकण विभागाने सर्वाधिक टक्केवारी मिळवली असून छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. मुंबई, पुणे आणि कोल्हापूर विभागांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विभागनिहाय निकाल टक्केवारी
कोकण : ९७.६२ टक्के
कोल्हापूर : ९५.४७ टक्के
मुंबई : ९४.९७ टक्के
पुणे : ९४.२४ टक्के
अमरावती : ९०.५० टक्के
नाशिक : ९०.५३ टक्के
नागपूर : ८९.०७ टक्के
लातूर : ८८.४२ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ८८.४१ टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत राज्यात मानाचा तुरा मिळवला असून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










