‘सह्याद्री’च्या रिसर्च लॅबचे उद्घाटन
कोकणातील विद्यार्थ्यांसाठी नवे दालन खुले
चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सह्याद्री जिम्नॅशियम आणि गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे येथील अत्याधुनिक रिसर्च लॅबचे उद्घाटन सुप्रिया लाइफ सायन्सेसचे चेअरमन डॉ. सतीश वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. या दुहेरी उपक्रमामुळे कोकणातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात नवे दालन खुले झाले आहे.
विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक नव्हे, तर शारीरिक व मानसिक सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने संस्थेने आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे जिम्नॅशियम उभारले आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम यांसारख्या विविध क्रीडाप्रकारांसह अत्याधुनिक व्यायामशाळेची सोय एकाच छताखाली उपलब्ध केली. या माध्यमातून सहयाद्री शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत क्रीडाक्षेत्रातही प्रगती करण्यासाठी आवश्यक वातावरण मिळणार आहे.
याचबरोबर गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे येथे उभारण्यात आलेली अत्याधुनिक रिसर्च लॅब विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात नवी दिशा देणारी ठरणार आहे. आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेली ही लॅब विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देऊन औषधनिर्मिती आणि विज्ञान क्षेत्रात नवे संधीसाधन निर्माण करेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. कोकणातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा खऱ्या अर्थाने एक मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
डॉ. सतीश वाघ यांनी कोकणात अशा दर्जेदार रिसर्च लॅबची गरज अधोरेखित करत सुप्रिया लाइफ सायन्सेसचा सह्याद्री शिक्षण संस्थेला संशोधन क्षेत्रात कायम पाठिंबा राहील, असे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष व आमदार शेखर निकम यांनी सह्याद्री शिक्षण संस्था कोकणातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सदैव कटिबद्ध असून जिम्नॅशियम व रिसर्च लॅब हा त्या दिशेने उचललेला महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे नमूद केले. उद्घाटनानंतर मान्यवरांनी जिम्नॅशियम व रिसर्च लॅबची पाहणी केली.
उद्घाटन सोहळ्यास उपाध्यक्ष प्रशांत निकम, उपाध्यक्षा युगंधराताई राजेशिर्के, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, संचालक गुलाब सुर्वे, हरिश्चंद्र सुर्वे यांच्यासह अनेक विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.











