WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

हॉस्पिटलच्या काऊंटरमधून लांबविली १ लाखाची रोकड


हॉस्पिटलच्या काऊंटरमधून लांबविली १ लाखाची रोकड

पोलिसांनी अवघ्या ४ तासांत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

चिपळूण : शहरातील मार्कंडी परिसरातील एच. आर. वुमन हॉस्पिटल येथे काऊंटर टेबलच्या ड्रॉव्हरमधून एक लाख रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी सुमारे ७.५३ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या चार तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. चोरीस गेलेली संपूर्ण रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे.

या प्रकरणी इम्रान अख्तर हुसैन अन्सारी (वय ४१, रा. मुंब्रा, ठाणे) याला अटक करण्यात आली आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

सीसीटीव्हीच्या आधारे तपासाचा धागा
गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हॉस्पिटलच्या काऊंटर टेबलच्या ड्रॉव्हरमधील एक लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, विकास निकम, हेडकॉन्स्टेबल वृशाल शेटकर, संदीप माणके, पोलीस नाईक रोशन पवार, शिपाई शैलेश वनगे, रुपेश जोगी आदींच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामधून आरोपी ज्या रिक्षामधून पसार झाला होता, त्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यात आला.

चिपळूणहून खेड, तेथून दिव्याकडे प्रवास
तपासात आरोपी चिपळूण बसस्थानकातून खेडकडे जाणाऱ्या एस.टी बसमध्ये बसल्याचे निष्पन्न झाले. संबंधित बसच्या वाहकाशी संपर्क साधून आरोपी कोणत्या ठिकाणी उतरला याची माहिती घेतली असता तो खेड रेल्वे स्थानक येथे उतरल्याचे समोर आले. त्यानंतर खेड रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून आरोपी पुढे मुंबईकडे जाणाऱ्या दिवा रेल्वेत बसल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ चिपळूण पोलिसांनी दिवा येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेशी संपर्क साधून समन्वय साधला.

दिवा रेल्वे स्थानकातून अटक
दिवा रेल्वे स्थानकात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेली एक लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे चिपळूण पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत असून, सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर करून अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!