WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

कॅलिफोर्निया कृत्रिम, कोकणचा निसर्ग जपूया : पालकमंत्री उदय सामंत


कॅलिफोर्निया कृत्रिम, कोकणचा निसर्ग जपूया : पालकमंत्री उदय सामंत

ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन

चिपळूण : विपुल निसर्गसंपदेने नटलेल्या कोकणाचे वैभव सकारात्मक पद्धतीने मांडले गेले पाहिजे. कोकणाच्या तुलनेत कॅलिफोर्निया केवळ दहा टक्के आहे. कोकण म्हणजे खरा निसर्ग, तर कॅलिफोर्नियामध्ये कृत्रिमता आहे. त्यामुळे कोकणातील निसर्ग टिकवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा, उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी केले.

राज्यात प्रथमच कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था आयोजित मांडकी -पालवण येथे ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ना. उदय सामंत यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी ते बोलत होते. सामंत म्हणाले की, साहित्य संमेलने केवळ चर्चेपुरती मर्यादित राहू नयेत; त्यातून शासनाला दिशा मिळाली पाहिजे. विश्व मराठी साहित्य संमेलन यावर्षी नाशिक येथे होत आहे. कुसुमांग्रजांचे हे गाव आहे. जगभरातील मराठी भाषिक येथे यावेत, हा यामागचा उद्देश आहे. सीमा भागातील मराठी ग्रंथालयांना शासनाने अनुदान दिले. त्यातून अनेक वाचनालये उभी राहत आहेत. मातृभाषा टिकवण्यासाठी अशा संमेलनांची गरज असून सीमा भागातील मराठी ग्रंथालयांना शासनाने अनुदान दिले आहे.

साहित्य संमेलनात नेहमीच राजकारण्यांवर टिका केली जाते. मात्र राजकारणात देखील कलाकारांची काही कमी नाही. काही राजकारणी २४ तास मेकअप लावूनच असतात. ते पुढे म्हणाले, राज्यकर्त्यांचा उद्धार केल्याशिवाय साहित्य संमेलने पूर्णच होत नाहीत. त्यामुळे आम्हाला किती अनन्यसाधारण महत्व आहे हे तुम्हाला कळते. पण मी कित्येक वेळा सांगितलेय साहित्य संमेलनात राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप असणार नाही.

कोकण सुपुत्रांचा सन्मान करताना त्यांनी बॅरिस्टर नाथ पै यांच्या उल्लेख केला. राजकारण्यांनी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चाललो तर कोकणचा विकास नक्कीच होईल. कोकण रेल्वेचे निर्माते मधू दंडवते यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला, तर चरित्रकार धनंजय कीर यांचे नाव रत्नागिरी उपकेंद्राला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पद्मश्री पोपटराव पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत,“जिल्ह्यातील पाच ते दहा गावे आदर्श झाली पाहिजेत. त्याची निवड करताना आमदार भास्कर जाधव यांच्याही मतदार संघातील दोन गावांचा समावेश असेल असे सांगत त्या गावांना पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन करावे जाईल,” असे त्यांनी जाहीर केले.

कोकण कृषी विद्यापीठ बाबत म्हणाले, कृषी विद्यापीठे हे संशोधनाची केंद्रे बनली पाहिजेत. येथून शास्त्रज्ञ घडले पाहिजेत. जेणेकरून शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मदत होईल. लागलेली कीड त्याच वर्षी गेली पाहिजे, अशी कोपरखळी देखील मारली. कृषी विद्यापीठांमध्ये सुमारे २५ हजार एक जागा पडीक आहेत, त्यांचा संसोधनासाठी वापर व्हायला हवा. मराठी भाषा ही जगातील प्रगत भाषा आहे. महाराष्ट्रात केवळ मराठीचीच सक्ती राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच कार्यक्रमाला उशिरा आल्याबद्दल आयोजक व उपस्थित साहित्यिक, साहित्यप्रेमी व नागरिक यांचीही जाहीर माफी मागितली.

संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले, शासनाच्या सहकार्यामुळे राज्यातील पहिले ग्रामीण साहित्य संमेलन येथे होऊ शकले. साहित्यीकांनी नेहमीच सकारात्मकता मांडायला हवी. भाषा आणि समाजा-समाजात वाद, विद्धंस होईल, असे लिखान करू नये. बोलीभाषा टिकण्यासाठी व मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी सर्वांनीच योगदान द्यायला हवे.

स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. संजय भावे म्हणाले, जगात शेती आणि शिक्षण हेच शाश्वत आहे. अलिकडच्या ग्रामिण लेखनामध्ये शेती, संशोधन समस्या येत नाहीत. त्यामुळे साहित्यीकांनी यााकडे लक्ष दिले पाहिजे. यानिमित्त डॉ. तानाजीराव चोरगे लिखित ‘आंदोलन ‘ या पुस्तकाचे तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सुत्रसंचालन संजय भुस्कुटे तर आभार अरूण इंगवले यांनी मानले.

या वेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, पद्मश्री पोपटराव पवार, चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ, स्वागताध्यक्ष व कुलगुरू डॉ. संजय भावे, संपादक सागर देशपांडे, रत्नागिरी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, साहित्य संमेलन संयोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह डॉ. निखिल चोरगे, मानसिंगराव थोराटे, बाबाजी जाधव, दैनिक सागरच्या संपादक शुभदा जोशी, उद्योजक प्रशांत पटवर्धन, राजू जोशी, डॉ. मीनल ओक, मिलिंद कापडी, नितीन उर्फ अबू ठसाळे, विनोद झगडे, निहार कोवळे, सुरेश खापले, शरद शिगवण, संजय भुस्कुटे, अरुण इंगवले आदी उपस्थित होते.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!