चार जणांची भाजप पक्षातून हकालपट्टी व निलंबन
नगर पालिका निवडणुकीतील पक्षविरोधी काम पडले महागात
जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी केली कारवाई
चिपळण : चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी चार पदाधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी व निलंबित केले आहे. यामुळे चिपळुणात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधितांकडून अपक्ष तसेच विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार आणि उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढविल्याचे पुराव्यासह आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये माजी नगराध्यक्षा सुरेखा नितीन खेराडे (माजी जिल्हाध्यक्षा, महिला मोर्चा उत्तर रत्नागिरी) व सुधीर सुधाकर पानकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच श्रीराम शंकर शिंदे (माजी शहराध्यक्ष, चिपळूण शहर मंडळ) आणि परिमल सुरेश भोसले (जिल्हा उपाध्यक्ष, रत्नागिरी दक्षिण) यांचे निलंबन करण्यात आले आहे.
ही कारवाई महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी स्पष्ट केले आहे. चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षशिस्त अबाधित ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेतल्याचे पक्षाच्या वर्तुळात बोलले जात आहे. या कारवाईमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.














