वहाळ गटातील दोन उमेदवारांची माघार
नेत्यांकडून बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरूच
चिपळूण : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू असून अपक्ष आणि बंडखोरांच्या माघारीसाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यात काही ठिकाणी यश येताना दिसत आहे. शनिवारी वहाळ जिल्हा परिषद गटातून दोघांनी माघार घेतली आहे. तर कोकरे आणि उमरोली गटातील अपक्ष व बंडखोरांच्या माघारीसाठी संबंधीत उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद ९ गटात ४४ तर पंचायत समितीच्या १८ गणात ७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी तिघांनी माघार घेतली. शनिवारी वहाळ गटातील स्वाती सचिन जंगम व स्नेहश्री सुरेंद्र सुर्वे या दोघा उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. वहाळ गटात शिंदे सेनेकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. शिवसेना भाजप युतीत वहाळ गट शिवसेनेला सोडण्यात आला. स्नेहश्री सुर्वे यांनी उमेदवारी दाखल केल्याने युतीत पेच निर्माण झाला होता. मात्र सुर्वे यांनी माघर घेतल्याने जिल्हा परिषदेचा तिढा सुटला. परंतु या गणातील पेच मात्र सुटलेला नाही. येथील अपक्ष आणि बंडखोऱाच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत.
कोकरे आणि उमरोली गटातील बंडखोरी अद्याप कायम राहिली आहे. बंडखोर उमेदवार एक दोन दिवसात माघारी घेऊन तलवार म्यान करणार की निवडणूकीच्या आखाड्यात कायम राहणार हे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.













